जळगाव

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा – इति पाण्डेय..

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या १२ दिवसीय ग्राम संवाद सायकल यात्रेस आरंभ..

जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) – ‘महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालले तर, आपण खरे असल्याचे आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता भासत नाही. खोट्याचे अनेक चेहरे असतात परंतु सत्याचा एकच चेहरा असतो असे म्हटले जाते. गांधीजींच्या सहज सोप्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार आपण करावा’ असे मोलाचे विचार रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक (DRM) इति पाण्डेय यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी पुण्यतिथी (हुतात्मा दिनी, दि. ३० जानेवारी) निमित्ताने स्वस्थ समाज व सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी व गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे “ग्राम संवाद सायकल यात्रा” आयोजण्यात आली या यात्रेस त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आरंभ झाला. गांधी तीर्थ येथील या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सहभागी सायकल यात्रींसह उपस्थितांना अशोक जैन यांनी स्वच्छता संबंधीत प्रतिज्ञा दिली. यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमास जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डाॅ. गीता धर्मपाल, डाॅ. अश्विन झाला यांची उपस्थिती होती.
माझ्या व्यक्तीगत जीवनात मी महात्मा गांधीजींच्या अनेक तत्त्वांचा अंगिकार करत असते या बाबत सांगताना त्या म्हणाल्या की, सकाळी माझ्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होते. आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी वाम मार्गाचा अवलंब न करता मेहनत व प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा ठरतो. या यात्रेच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत चांगला संदेश तुम्ही घेऊन जावे, रस्त्याने सायकल चालवितांना सुरक्षीतपणे सायकल चालवावी असेही आवाहनही इति पाण्डेय यांनी केले.
या सायकल यात्रेत विविध राज्यातील आणि स्थानिक अशा ४० स्वयंसेवकांचा सहभाग आहे. १२ दिवसांच्या या यात्रेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, महिला व नागरिकांशी संवाद साधला जाईल. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील सात तालुक्यातून जवळजवळ ३५० किमीचा प्रवास या यात्रेचा असणार आहे. यात्रेत शाळा / महाविद्यालयात दोन दैनंदिन कार्यक्रम असतील तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जनजागृतीबाबत जाहीर कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या व प्रजासत्ताक अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने तयार करण्यात आलेली प्रदर्शनी कार्यक्रमांच्या ठिकाणी मांडली जाणार आहे. निरोगी, सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिश्रा यांनी केले.

स्वच्छतेबाबत मा. अशोक जैन यांनी दिलेली प्रतिज्ञा
मी प्रतिज्ञा करतो की – मी सत्य, अहिंसा, प्रेम, शांती, बंधुता, सद्भाव, सहकार्य आणि पवित्रता यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी स्वतः आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरुक राहीन. मी कचरा टाकणार नाही आणि इतर कोणालाही कचरा टाकू देणार नाही. या संस्कारांची सुरुवात मी स्वतःपासून करून माझे गाव स्वच्छ आणि पवित्र धाम बनवेन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करून त्यास नंदनवन बनवीन.
मी माझ्या शरीराची पवित्र अशा मंदिराप्रमाणे काळजी घेईन आणि कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही. निरोगी आणि सशक्त समाजासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य सदैव पार पाडीन.
सर्व रोगांवर एकच औषध, घरा-घरातील स्वच्छता ! स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर ! स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती ! जो करते है योग, वही हमेशा रहते है निरोग…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button