टीम आवाज मराठी, चोपडा | २४ जून २०२३ | सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तलवारीने केक कापल्याप्रकरणी आठ संशयित विरोधात चोपडा पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २२ जून रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी रोडवर वाढदिवसाचा केक कापण्यासाठी लोखंडी धारदार तलवारीचा वापर करण्यात आला होता. केक कापण्याचे फोटो संबंधितांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे या प्रकरणी चोपड्यातील आठ जणांवर चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
चोपडा शहर पोलीस स्टेशन मधील पो.हे.कॉ. निलेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहरातील शेतपुरा भागातील रहिवासी सय्यद फैजल अली मझहर अली, रॉयल एजन्सी समोर मास्टर कॉलनी मधील रहिवासी शाकीर सय्यद साबीर अली, दानिश सय्यद साबीर अली, शेतपुरा भागातील रहिवासी रिजवान अली अयाज अली, मास्टर कॉलनी मधील रहिवासी दानिश शेख हमीद शेख, के.जी.एन कॉलनी मधील रहिवासी बाबू लोहार निजाम लोहार, चुनार अळी जबरे राम मंदिर परिसरातील रहिवासी साजिद शेख गफ्फार आणि फकीरवाडा मधील रहिवासी शोएबशाह जाकीर शाह या आठ संशयित आरोपी विरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह (37) (1) (3) चे उल्लंघन 135, भादवी कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा संदर्भात २ हजार रुपये किमतीची एका बाजूला धारदार, टोकदार लोखंडी पाते असलेली २८ इंच लांब अशी तलवार व १.५ इंच रुंद व त्यास पितळी धातूची सहा इंचाची मूठ असलेली तलवार (आतील भाग काळा रंगाचा त्यावर सोनेरी रंगाचा दोरा गुंडाळलेली) शोएब शाह जाकीर शाह (रा. फकीरवाडा) याचे घरात आढळून आली. संशयित आठ आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलीस नाईक संदीप छगन भोई करीत आहेत.