
सतीश पाटील, टीम आवाज मराठी भडगाव | तालुक्यातील गोंडगावात अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामधून लपवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेतील संशयिताला गुरुवारी पोलिसांनी अटक केलीय.
स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. मुलीवर लैगिंग अत्याचार केल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड टाकला आणि त्यानंतर मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून दिल्याची कबूली दिलीय.
या संशयिताला तपासासाठी घटनास्थळाची नेल्यावर संशयिताला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केली. या घटनेत तीन पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेत मुलगी मिळून येत नसल्याने ती बेपत्ता झाल्यासह अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनला केली होती. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयिताच्या अटकेसाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी भडगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत अत्यसंस्कार न करण्याचा पावित्रा घेतला होता. दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येवू लागल्याने हा प्रकार उघडकीला आला.
मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील पाटील याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वप्निल याला अटक केली. ३० जुलै रोजी दुपारी मुलीला आमिष दाखवून संशयिताने त्याच्या गोठ्यात तिला बोलाविले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगड मारून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह त्याने गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीखाली लपवून ठेवला होता. अशी कबूली संशयिताने पोलिसांना दिली.
संशयित स्वप्नील विनोद पाटील याला अटक केली असून त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. दरम्यान गुरुवारी सायंकाळी संशयित याला ५५ ते ६० पोलीस बंदोबस्तात घटनास्थळाच्या पडताळणी जात गोंडगाव येथे नेत असतांना, संशयितास आमच्या हवाली करा म्हणत ग्रामस्थांनी गोंधळ घातला. यात संशयिताला ताब्यात घेण्यावरुन पोलीस आणि जमावात झालेल्या वादातून पोलिसांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीत ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली. असून गोंडगावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात दाखल गुन्ह्यात खूनाचे कलम वाढविण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी सुध्दा झालीय. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अहवालानंतर आणखी कलम वाढविण्यात येतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिलीय.