ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना चिरडलं!
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील भीषण अपघात
टीम आवाज मराठी, प्रतिनिधी मलकापूर | दिनांक २ ऑक्टोबर २०२३ । मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर एक भीषण अपघाताची माहिती समोर आलीय. रस्त्याच्या एका कडेला झोपलेल्या कामगारांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना आज पहाटे सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. या अपघातात ४ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची नावे अजूनही समोर आली नसून जखमींना तातडीने उपचारासाठी मलकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम चालू आहे. या कामासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथून काही कामगार आले होते. रविवारी दिवसभर काम केल्यानंतर मजूर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. दरम्यान, गाढ झोपेत असताना आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एक भरधाव ट्रक आला आणि थेट पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. या घटनेत पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले कामगार चिरडले गेले. यातील ४ कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ६ कामगार गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनं परिसरातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे..