जळगाव

संचालक मंडळ बरखास्त करून त्यांच्यावर कारवाई व्हावी – मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ.

खडके बु. येथील मुलींच्या बालगृहात पाच मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरण

टीम आवाज मराठी उमेश महाजन एरंडोल प्रतिनिधि | २९ जुलै २०२३ | येथील एरंडोल तालुक्यातील खडके बु. येथील मुलींच्या बालगृहात पाच मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक मंडळांवर गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी पत्रकार परिषद द्वारे केली आहे. एरंडोल येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी तालुकाध्यक्ष विशाल सोनार,उपाध्यक्ष अनिल बागुल,उपशहराध्यक्ष जगदीश सुतार तालुका उपाध्यक्ष उपस्थित होते.
खडके बु. येथील कै. यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मुलींच्या बालगृहात पाच मुलींवर संस्थेचा काळजीवाहक गणेश पंडित, त्याची पत्नी व सचिव यांच्यावरच का गुन्हा दाखल केला ? असा सवाल जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी उपस्थित करून याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक मंडळ यांची सुद्धा ही जबाबदारी नाही का ? असा सवाल विचारत यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी केली तसेच स्थानिक आमदार तथा लोकप्रतिनिधी यांनी या प्रकरणाबद्दल आवाज न उठवल्याबद्दल त्यांचा निषेध करत पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्यातील मंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच सर्वांना दोषी धरून कडक कारवाई व्हावी. अन्यथा मनसेतर्फे भविष्यात मोठ्या आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा दिला. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल सोनार, उपाध्यक्ष अनिल बागुल तथा पदाधिकारी यांनी खडके येथे भेट दिली असता दबक्या आवाजात अनेकदा या ठिकाणी अशा घटना घडलेल्या असून त्या दाबल्या गेल्या असल्याचे सांगितले.
खडके येथील बालगृहात आणखी एक अत्याचार उघडकीस.
दरम्यान खडके येथील एका मुलावर देखील सचिवाने अत्याचार केल्याचे समोर आले असून संस्थाध्यक्षासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि. २९ जुलै २०२३ रोजी बालगृहातील ११ वर्षीय बालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार होळीच्या दिवशी त्याने पाणी भरण्यास नकार दिल्यामुळे संशयित आरोपी गणेश पंडित यांच्या सांगण्यावरून वस्तीगृहातील आठ – दहा मुलांनी या बालकाला लाथा बुक्क्यांनी पाठ , छाती व पोटावर मारहाण केली होती तसेच एके दिवशी रविवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तो वॉशरूमला गेला असता गणेश याने त्याच्यावर शारीरिक व लैंगिक अत्याचार केले तसेच सदर घटना मुलाने संस्थेचे अध्यक्ष व संबंधितांना सांगितले असता त्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ दादाजी यशवंत पाटील (वय ६०), सचिन प्रभाकर पाटील (वय ३०) , भूषण प्रभाकर पाटील (वय २८) सर्व राहणार ओम नगर धरणगाव रोड एरंडोल , गणेश शिवाजी पंडित (वय २९) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश पंडित यांच्यावर हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला बालकल्याण समिती चौकशी करीत असताना हा दुसरा प्रकार उघडकीस आल्याने फिर्यादी बालकाला मारहाण करणाऱ्या सातही अल्पवयीन बालकांना सध्या जळगाव येथील बाल निरीक्षण गृह ठेवण्यात आले आहे दरम्यान दुसरा गुन्हा उघडकीस आल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button