सासरच्या त्रासाला विवाहितेने घेतली विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
पाचोरा शहरातील गोविंद नगर परिसरातील घटना
टीम आवाज मराठी, पाचोरा | १३ जुलै २०२३ | येथील पाचोरा शहरातील गोविंद नगर परिसरातील राहत्या घरानजीक असलेल्या विहिरीमध्ये उडी घेऊन एका १९ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना १३ जुलै गुरुवार रोजी पहाटेच्या सुमारास निदर्शनास आली आहे. सदर घटनेबाबाबत या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विवाहितेला सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्यामुळेच विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करीत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी राहुल चव्हाण यांचा प्रेमविवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वीच झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनी चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजल हीस तिची आजल सासु सुग्राबाई चव्हाण, सासु मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचुन टोचून बोलत असल्याने त्यांच्यात वाद-विवाद सुरू होते. सतत त्यांच्यात होणाऱ्या भांडणामुळे राहुल चव्हाण हा १० जुलै रोजी काजला घेऊन पाचोरा शहरातील गोविंद नगर परिसरात भाड्याची खोली घेऊन राहण्यास आला होता. दरम्यान १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजलने अतिशय टोकाचे पाऊल घेऊन घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली.
सदर घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेच्या मदतीने काजल हीस पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी काजल हीस मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात काजलच्या आईसह माहेरच्या मंडळींनी आक्रोश करीत सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून काजल हिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. सदर घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.