जळगाव

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

ॲड. नीलम शिर्के सामंत यांच्याकडून जैन उद्योग समूहाच्या उपक्रमाचे कौतुक

जळगाव, दि. १२ (प्रतिनिधी) : जैन उद्योग समूहाने उभारलेला जगातील सर्वात मोठा लामणदिवा ही अप्रतिम कलाकृती असून, सोशल मीडियावरील छायाचित्रे आणि रील्सपेक्षाही प्रत्यक्षातील या दिव्याचे सौंदर्य अधिक विलोभनीय आहे. याबद्दल जैन उद्योग समूहाचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन करते, अशा भावना मराठी चित्रपट, मालिका व नाट्यसृष्टीतील अभिनेत्री तसेच बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के सामंत यांनी व्यक्त केल्या.

जळगाव भेटीदरम्यान त्यांनी काव्यरत्नावली चौकातील जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य लामणदिव्याची सजावट पाहिली. त्याबद्दलची माहिती आर्टिस्ट कंपनीचे माजी सहकारी राजेश नाईक व जैन इरिगेशनचे सहकारी किशोर कुलकर्णी यांनी दिली.

या दिव्याची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहोचली असून, अत्यंत कल्पकतेने आणि आकर्षक पद्धतीने ही भव्य कलाकृती साकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिवसा जितका सुंदर दिसतो, तितकेच रात्रीच्या प्रकाशात त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसत असेल, असे देखील नीलमताईंनी सांगितले.

गेल्या वीस वर्षांपासून जैन इरिगेशनतर्फे काव्यरत्नावली चौकात विविध सण, उत्सव आणि विशेष प्रसंगांनिमित्त आकर्षक सजावट केली जाते. कवितेला समर्पित असलेला महाराष्ट्रातील हा एकमेव चौक असून, अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे तो जनमानसात विशेष लोकप्रिय झाला आहे अशी ही माहिती त्यांना देण्यात आली.

छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहाला देखील भेट

‘नाटक ही माझी पहिली आवड आहे, रंगमंचावरून अनेक मोठ्या कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे. अशा आधुनिक यंत्रणेने सज्ज असलेल्या नाट्यगृहाला भेट देणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे…’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. भविष्यात होणाऱ्या बाल रंगभूमी परिषदेच्या उपक्रमांना या नाट्यगृहाचा उपयोग होऊ शकतो या उद्देशाने त्यांनी भेट दिली. यावेळी अनिल जोशी, बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह रंगकर्मी योगेश शुक्ल, हर्षल पवार, होनाजी चव्हाण तसेच विजय पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button