
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या बनावट प्रोफाईलवरून आक्षेपार्ह पोस्ट्स; नशिराबादचा होमगार्ड जाळ्यात
चेन्नई सायबर सेलची मोठी कारवाई; तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोधला आयपी ॲड्रेस
जळगाव : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून आक्षेपार्ह कमेंट्स व एआय व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील होमगार्डला चेन्नईच्या विशेष सायबर पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले.
मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन (३८, रा. ताजनगर, नशिराबाद) असे कारवाई झालेल्या होमगार्डचे नाव आहे. याप्रकरणी चेन्नईच्या आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान या प्रकाराची लिंक नशिराबादमध्ये असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर वेस्ट झोन सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. पालवेशम यांच्या पथकाने नशिराबाद गाठून स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने जुनेदला पकडले. जळगाव न्यायालयाची कायदेशीर परवानगी मिळवून हे पथक आरोपीला घेऊन चेन्नईला रवाना झाले आहे.





