भुसावळ विभागातून काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल
तुम्ही या गाड्यांनी प्रवास करणार तर स्टेशनवर जाण्याआधी जाणून घ्या
टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक ८ सप्टेंबर २०२३ | रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांच्या वेळेत काही बदल करण्यात आलेला असून त्यामुळे तुम्ही जर या गाड्यांनी प्रवास करत असाल तर सर्वात आधी गाड्यांचा बदल बघूनच स्टेशनवर जावे.
गोरखपूर- भटनी सेक्शन दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे दि. ११ सप्टेंबरपर्यंत ठराविक रेल्वे गाड्या गोरखपूरपर्यंत जाणार नाही. काही रेल्वे या भटनीत तर काही रेल्वे महू येथेच थांबतील आणि तेथूनच सुटतील. गोरखपूर-भटनी सेक्शन दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम घेण्यात आले आहे. यासाठी गाडी क्र. १२१६५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर ही ८ रोजी भटणी स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. भटनी ते गोरखपूर दरम्यानची गाडी रद्द राहील.
गाडी क्रमांक १२१६६ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही ८ व ९ रोजी भटनी स्टेशन येथून सुटणार. गोरखपूर-भटनी दरम्यान गाडी रद्द राहील. गाडी क्र. ११०३८ गोरखपूर-पुणे ही ९ रोजी महू येथून सुटेल. गोरखपूर ते महू दरम्यान गाडी रद्द राहील. गाडी क्र. ०१०२८ गोरखपूर -दादर दरम्यान विशेष गाडी ९ व ११ रोजी महू स्टेशन येथून सुटेल. गोरखपूर ते महू दरम्यान गाडी रद्द राहील. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.