सफाई कामगाराचा शेतातील कुंपणात विजप्रवाह सोडल्याने मृत्यू
नशिराबाद पोलिस स्टेशनला सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक ६ सप्टेंबर २०२३ येथील जवळच असलेल्या नशिराबाद येथील शेताच्या कुंपणात विविध ठिकाणी सरपण ठोकून त्यात विज प्रवाहाचे तार सोडून त्याला स्पर्श झाल्याने शेतमजूराचा मृत्यू झाला. विशाल गोपी चिरावंडे असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान विठोबा वाणी यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोपान विठोबा वाणी याने नशिराबाद येथील रहिवासी दिलीप कुलकर्णी यांच्या कडून घेतलेल्या शेतात असलेल्या तार कुंपणात विविध ठिकाणी सरपण ठोकून त्यात विजेची तार लावून त्यात विज प्रवाह सोडला होता. या विज प्रवाहामुळे एखाद्याचा जीव जावू शकतो हे माहिती होते तरी देखील विज प्रवाह सुरुच ठेवण्यात आला आणि नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना कोणतीही सूचना न देता सफाईचे काम करु दिले. त्यात साई सिद्धी इनव्हायरो या नाशिकच्या खासगी कंपनीतील मजुरीने काम करणारा मजूर विशाल गोपी चिरावंडे हा ठार झाला. याप्रकरणी मयत विशालचे काका विनोद चिरावंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे करत आहेत.