
जळगाव जिल्ह्यात पोलिसांचे एकाचवेळी कॉम्बिंग ऑपरेशन; १४.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त
३६ अवैध धंदेचालकांवर कारवाई; २८१ रेकॉर्डवरील आरोपी, ७४२ संशयित वाहनांची तपासणी
जळगाव : मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासह अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, संशयित वाहनांची झाडाझडती तसेच भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. विविध कारवायांमध्ये एकूण १४ लाख ७८ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित (जळगाव) आणि अशोक नखाते (चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
१५७ भंगार दुकानांची तपासणी
चोरीचा मुद्देमाल भंगार दुकानांमार्फत विक्री अथवा विल्हेवाट लावला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी जिल्ह्यातील १५७ भंगार दुकानांची तपासणी केली. तसेच २८१ रेकॉर्डवरील आरोपींची चौकशी व पडताळणी करण्यात आली. याशिवाय ७४२ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.
२३ जणांना वॉरंट बजावले
कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान ५ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर २३ जणांना वॉरंट बजावण्यात आले. पोलिसांच्या या व्यापक मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
अवैध दारूविक्रीवर कारवाई
अवैधरीत्या गावठी तसेच देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांविरुद्ध ३६ कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत ७३८ लिटर गावठी दारू, ६ हजार १३० लिटर कच्चे रसायन तसेच १६४ देशी-विदेशी दारू व बीअरच्या बाटल्या असा एकूण ४ लाख ७८ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवरही कारवाई
अवैध वाळू वाहतुकीविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये १० लाख रुपये किमतीचा डंपर आणि १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. तसेच कोयता घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीविरुद्धही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही राबविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.



