पोलीस वाहनावर कोसळले झाड, दोन ठार
तपास कामी गेलेल्या एपीआयसह पोलीस वाहन चालकाचा अपघातात मृत्यू
टीम आवाज मराठी, एरंडोल । २९ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यात असलेल्या एरंडोल तालुक्यातील खडके शिवारातील अंजनी धरणाजवळ दुर्दैवी घटना घडली आहे. पिलखोड येथून तपासकामी जळगावला परतत असताना रस्त्यामध्ये चिंचेचे मोठे झाड सरकारी वाहनावर पडल्यामुळे मोठा अपघात होऊन चालक पोलिसासह एपीआय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन पोलीस जखमी झाले आहे. एरंडोल पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी मदत कार्य करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
पिलखोड येथून जळगावकडे सरकारी वाहन टाटा सुमोमधून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक वाहन क्रमांक (एम एच १९ एम ७५१) ने येत होते. अंजनि धरणाजवळ अचानक चिंचेचे झाड गाडीवर पडल्यामुळे चालकासह अधिकारी ठार झाले. अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर ( वय ३६) व चालक अजय चौधरी (वय ४०) हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले.अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हे घटनास्थळी पोहचले. आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.