जळगाव

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जनसंवाद!

विभागीय आयुक्तांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची ई-पीक पाहणी

टीम आवाज मराठी धरणगांव प्रतिनिधि | ३ ऑगस्ट २०२३ | आज धरणगाव तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट जनसंवाद साधताना नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या समस्यांच्या निराकरण करण्याचा प्रयत्न केला. विभागीय आयुक्तांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची ई-पीक पाहणी करण्यात आली.

बांभोरी येथील रघुनाथ साहेबराव पाटील या शेतकऱ्याच्या गट नंबर ३३३ वरील कापूस पिकांची ई-पीक पाहणी विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी गावातील शिवारातील शेतकऱ्यांची रस्त्यावर बैठक घेण्यात आली. यात महसूल विषयक विविध अडचणी, प्रलंबीत प्रकरणांची माहिती जाणून घेऊन सदरील प्रकरणांचा तात्काळ निपटारा लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले. सातबारा उताऱ्यावरून पोटखराब क्षेत्र वगळले का? १ रूपयात पीक विमा योजनेचा अर्ज भरला का?  ई-पीक पाहणी करून घेतले का? इतर प्रश्न विचारत विभागीय आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक विमा व ई-पीक पाहणीमध्ये गावात शंभर टक्के कामे झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. महसूल प्रशासनाच्या कामाबद्दल आपण समाधानी आहात का? या प्रश्नांवर शेतकरी म्हणाले, महसूल प्रशासनाकडून आमची कामे तसेच कागदपत्रांची कामे वेळेवर होत असतात. महसूल विभागाच्या कामाबद्दल आम्ही समाधानी आहोत.

कापूस फवारणी करतांना विषारी औषधांपासून स्वतःचा बचाव करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन आदी प्रशासकीय अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button