राज्य

पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी मिनी बसचा अपघात, एसटीने मागून दिली धडक

सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही

टीम आवाज मराठी | ३१ जुलै २०२३ | पंढरपूरला पंढरीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भुसावळ येथील भाविकांचा टेम्पो ट्रॅव्हलर खाजगी मिनी बसला ओव्हरटेक करीत असताना एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. पण सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून चार जण गंभीर, तर चार किरकोळ जखमी झाले आहेत. बीड तालुक्यातील रौळसगावच्या जवळपास शनिवारी सकाळी हा अपघात झाला. सदर जखमी भाविक हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी असून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. कोळी कुटुंब व त्यांचे नातेवाईक (एमएच १९ वाय ६१०२) या क्रमांकाच्या खाजगी मिनी बसने पंढरपूर येथे पंढरीच्या दर्शनासाठी जात होते. यात एकूण १७ प्रवासी होते. सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील रौळसगावजवळ जात असताना ह्या भाविकांच्या मिनी बसवरील चालकाकडून  ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा  सुटल्याने मिनी खाजगी बसला मागून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (एमएच १४ डीटी १९२९) धडक दिली. पाठीमागून धडक दिल्याने मिनी बस रोडाच्या खाली गेली. तसेच समोरचा भागाचा चुराडा झाला. यात मिनी बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच तेथील परिसरातील जनसमुदयाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले तसेच महामार्ग पोलीस, नेकनूर पोलिस आणि रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली. पोलिस उपनिरीक्षक यशवंत घोडके, संजय खताळ, अनिल तांदळे, विलास ठोंबरे, सांगळे, जालिंदर सुरवसे, यांच्या पथकासह नेकनूर पोलिसांनी जखमींना मदत केली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविले. तसेच तेथील वाहतूकही सुरळीत सुरळीत करण्यात आली. जखमींमध्ये चार जणांची प्रकृती चिंताजनक असून, चार जणांची स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जखमींमध्ये नर्मदा कोळी (वय ६०), कैलास बोदडे (चालक), अश्विनी सपकाळे (वय २५), राजर्षी कोळी (१६) हे गंभीर जखमी आहेत. आशा कोळी (५०), सुरेखा कोळी (४०), मनीषा कोळी (४०), राहुल कोळी (३२) हे किरकोळ जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या बीड व परिसरातील नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button