जळगाव

गणेश विसर्जनासाठी मेहरून तलावावर अग्निशमन दल सज्ज; शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम

गणेश विसर्जनासाठी मेहरून तलावावर अग्निशमन दल सज्ज; शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम

भाविकांच्या सुरक्षेसाठी मनपा अग्निशमन दल व वन्यजीव संरक्षण संस्थेचा संयुक्त सराव; रबर बोटीतून जलद बचावकार्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील मेहरून तलाव गणेश घाटावर भाविकांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका अग्निशमन दल सज्ज झाले आहे. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी जळगाव शहर महानगरपालिका अग्निशमन दल आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली.
महानगरपालिका आयुक्तांच्या विशेष आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या मॉकड्रिलमध्ये जलद बचावकार्य, बोटीचे नियंत्रण आणि जीवरक्षक उपकरणांचा वापर याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले. मेहरून तलावाच्या पाण्यात OBM रबर बोट वेगाने चालवून आपत्कालीन परिस्थितीत पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला कमीत कमी वेळेत सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक जवानांनी सादर केले.
मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव पार पडला. केंद्र अधिकारी भारत बारी यांच्यासह अनुभवी वाहनचालक आणि फायरमन यांनी या मोहिमेत सहभाग घेत तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन केले.
अग्निशमन दलाच्या पथकात देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, निवांत इंगळे, अजय पाटील, प्रदीप धनगर, तेजस जोशी, गिरीश खडके, ऋषभ सुरवाडे, केतन पाटील, विकी सोनवणे, नितीन ससाने व रजनीश भावसार यांचा सहभाग होता. तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफडे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, अजीम काझी, प्रदीप शेळके, रामलाल बोरसे, दिनेश सपकाळे, गोकुळ पाटील व राजू गुप्ता यांनीही सरावात सहभाग घेतला.
“बाप्पाला निरोप देताना भाविकांची सुरक्षा हीच आमची पहिली प्राथमिकता आहे,” असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. मेहरून तलाव परिसरात अत्याधुनिक साधनसामग्रीसह प्रशिक्षित जवानांचे पथक २४ तास तैनात राहणार असल्याने गणेश विसर्जन सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button