जळगाव दि.२२ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ऐलिट गृपमधील एमसीए सीनियर लीग इन्व्हिटेशन क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातून २४ संघ सहभागी झालेत. आज पुणे येथे जळगाव जिल्हा विरुद्ध वाय एम सी ए या क्लब दरम्यान पहिला सामना खेळला गेला. जळगाव जिल्हा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जगदीश झोपे याचा हा निर्णय योग्य ठरवीत जळगावच्या आघाडी फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. आघाडीचे फलंदाज साहिल गायकर व नीरज जोशी यांनी ७५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर एका मागे एक असे दोन खेळाडू बाद झाले (नीरज जोशी २९ व सिद्धेश देशमुख ०) २ बाद ७५ अशी धावसंख्या झाली. डावाची पडझड न होऊ देता साहिल गायकर व पार्थ देवकर यांच्यात ५६ धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. संघाची धावसंख्या १३१ असताना साहिल गायकर आपल्या वैयक्तिक ७९ धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेच १५१ धावसंख्या फलकावर असताना पार्थ देवकर (१२) बाद झाला. बिपिन चांगरे याने माजी कर्णधार वरुण देशपांडे बरोबर १९ धावांची भागीदारी केली व चांगले स्थिरावत असताना बिपिन चांगरे (१९) बाद झाला जळगाव संघ ५ बाद १५१ धावांवर असताना सौरभ सिंग व वरुण देशपांडे यांनी दमदार भगिदारी करीत जळगाव संघाला अडचणीतून बाहेर आणले. त्यांच्या ८४ धावांच्या भागीदारी नंतर वरुण (५५) बाद झाला ६/२३५ यानंतर मात्र जळगाव चे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. दरम्यान सौरभ सिंग याने दमदार शतक झळकावले व तो जळगावचा शेवटचा फलंदाज म्हणून संघाच्या ३४६ धावसंखेवर ८५ षटकात संपुष्टात आला. वाय एम सी ए संघातर्फे पृथ्वी कंद याने ५/१०१ बाद केले. त्याला ऋषभ बन्सल २/४५ तसेच वेद अय्यर, अकाश बोराडे व निशांत नगरकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उद्या वा एम सी ए संघासमोर ९० षटकात ३४७ धावांचे लक्ष्य घेऊन आपल्या डावाची सुरुवात करतील.