गणेशोत्सव शांततेत साजरा करा, पोलिस प्रशासनाचे आवाहन
एरंडोलला शांतता समितीची बैठक संपन्न; २८ ऐवजी २९ रोजी साजरी होणार ईद
उमेश महाजन, आवाज मराठी एरंडोल | १८ सप्टेंबर २०२३ | एरंडोल शहर शांतताप्रिय असून हिंदू-मुस्लिमसह सर्वच जाती-धर्म-पंथाचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असून कायम जातीय सलोखा राखला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सवासह ईद देखील शांततेत, आनंदातच साजरे होणार असा विश्वास शांतता समिती बैठकीत सदस्यांसह प्रशासन, पोलिसांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे गणपती विसर्जन आणि ई-ए-मिलाद एकाच दिवशी 28 सप्टेंबर रोजी असल्याने मुस्लिम समाज बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवून 28 ऐवजी 29 रोजी साजरा करणार असल्याचे सांगितल्याने त्यांचा यावेळी सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
एरंडोल पंचायत समिती हॉलमध्ये पोलिस स्टेशन आयोजित शांतता समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक देविदासभाऊ महाजन होते तर व्यासपीठावर अमळनेरचे डीवायएसपी सुनील सुनील नंदवाळकर, पो. नि. सतिश गोराडे, शालिग्रामभाऊ गायकवाड, ज्येष्ठ शिवसैनिक रमेशअण्णा महाजन, माजी नगराध्यक्ष रविंद्रअण्णा महाजन, दशरथभाऊ महाजन, निवृत्त तहसिलदार अरूण माळी, मुख्याधिकारी विकास नवाळे यांची उपस्थिती होती.
गणेशोत्सवाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचना, कायदा-सुव्यवस्था, शिस्त, वेळेबाबत प्रास्ताविकात पो. नि. सतिश गोराडे यांनी माहिती दिली. मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी शहरातील सर्वच भागात मुरूम, कच टाकणे, मोकाट कुत्रे-डूकरे यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले. अमळनेरचे डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी एरंडोलच्या ऐतिहासिक वारसा, जातीय सलोखा, शांतताप्रिय शहर आदींबाबत कौतूक करून यंदा देखील तीच परंपरा कायम ठेवून शांततेत गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद साजरी करण्याचे आवाहन केले.
सदरप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजयअण्णा महाजन, शिवसेनेचे जगदीशदादा पाटील, माजी नगराध्यक्ष रविंद्रअण्णा महाजन, दशरथभाऊ महाजन, निवृत्त तहसिलदार अरूण माळी, ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव, जगदीश ठाकूर, गोटू (मनोज) ठाकूर, डॉ. एन. डी. पाटील, पत्रकार संजय चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. आपले विचार, सुचना मांडून सर्वांनी गणेशात्सव शांततेत साजरा करण्याचे आश्वासन देवून शासन, प्रशासन, पोलिसांना सर्व नागरीक, गणेश मंडळ सदस्य सहकार्य करीतील असे आश्वासन दिले. एरंडोल पो. स्टे. गोराडे, गणेश अहिरे, शरद बागल या त्रिमुर्तींनी शहरात शांतता राखण्याची उत्तम कामगिरी केल्याबद्दल डीवायएसपींसह सदस्यांनी अभिनंदन केले. यंदा 28 रोजी गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी येत असल्याने 28 रोजी गणेश विसर्जन तर 29 सप्टेंबर रोजी ईद साजरी करण्याचे मुस्लिम बांधवांनी सांगितल्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जहीरोद्दीन शेठ, असलम पिंजारी आदींचा सत्कार करण्यात आला. आभार सपोनि गणेश अहिरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मिलींद कुमावत, अनिल पाटील, संदीप पाटील आदींनी परिश्रम घेतले. सदरप्रसंगी पत्रकार कमरअली सैय्यद, आबा महाजन, व्ही. के. महाजन, प्रविण महाजन, प्रकाश शिरोडे यांचेसह आबा चौधरी, रविंद्र दौलत पाटील, प्रसाद दंडवते, जाकीर सैय्यद, मनसेचे विशाल सोनार आदींची उपस्थिती होती.