४५ हजाराची घेतली लाच, नंदुरबार शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
नवापुरला लाच घेताना वरिष्ठ लिपिकावर कारवाई
टीम आवाज मराठी, नंदुरबार। २२ जून २०२३ । स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्याची उर्वरीत हक्काच्या रजा रोखीकरणासाठी ४५ हजाराची लाच घेणाऱ्या नवापूर येथील सार्वजनिक हायस्कूलच्या वरीष्ठ लिपीकास नंदुरबार लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील तक्रारदार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या रजा रोखिकरणाची रक्कम नवापूर येथील दी.एन.डी.अँड एम.वाय.सार्वजनिक हायस्कूलचे वरीष्ठ लिपीक विनोद साकरलाल पंचोली यांनी दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. तक्रारदार यांची रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याबद्दलच्या मोबदल्यात विनोद पंचोली यांनी तक्रारदार यांच्याकडून ४५ हजाराची लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार यांनी नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावला होता. दिनांक २१ जून २०२३ रोजी सदर लाचेची रक्कम पंच, साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारताना पंचोली यास पथकाने रंगेहात पकडले. विनोद पंचोली यांच्या विरुद्ध नवापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी राकेश चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोहवा विजय ठाकरे, पोना संदीप नावडेकर, चापोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली आहे.