एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत

जळगाव, प्रतिनिधी दिनाक-27-9-2026 : शहर परिसरातील अजंठा चौफुली येथील इदगाह कॉम्प्लेक्स समोरून चोरीला गेलेली दुचाकी शोधण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीची ‘स्प्लेंडर प्लस’ दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेरा चौक, रझा कॉलनी (मेहरून) येथील रहिवासी फिर्यादी रमजान खान बाबू खान यांनी आपली दुचाकी (क्र. MH-19 DY 4874) १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास जळगाव-अजंठा चौफुली येथील इदगाह कॉम्प्लेक्ससमोर लावली होती. वैयक्तिक काम आटोपून परत आले असता त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेतला. दरम्यान पोलिसांनी तुळशीराम काल्यासिंग कासदे (वय २८, मूळ रा. झाकस, जि. बैतुल, मध्य प्रदेश; सध्या रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदिप चौधरी करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउनि चंद्रकांत धनके, ग्रै.पो.उप.निरी. विजयसिंग पाटील, पो.ना. प्रदिप चौधरी, पो.कॉ. रमाकांत साळुंखे, पो.कॉ. शशिकांत मराठे आणि पो.कॉ. योगेश घुगे यांच्या पथकाने पार पाडली.





