तरुणांनी जगण्यात व्यसनाला दूर ठेवा – अमृत बंग

टीम आवाज मराठी,जळगाव दि. 9 ऑक्टोबर 2024 : तरूणांनी आपल्या जगण्याचा हेतू काय आहे हे निश्चित करून वाटचाल केल्यास दीर्घकाळ आनंदी जीवन जगता येते मात्र या जगण्यात व्यसनाला दूर ठेवा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमृत बंग यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी कर्मवीर व्यंकटराव रणधीर व्याख्यानमाले अंतर्गत अमृत बंग यांचे व्याख्यान झाले. ‘निर्माण: युवांच्या अर्थपूर्ण जीवनाचा शोध’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी चिफ रेक्टर प्रा. एस.आर. चौधरी, डॉ. विशाल पराते, डॉ. अजय गोस्वामी, डॉ. सचिन नांद्रे उपस्थित होते. शिरपूरच्या कर्मवीर व्यंकटराव रणधीर प्रतिष्ठान यांनी दिलेल्या देणगीतून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. बंग म्हणाले की, वयाच्या २४व्या वर्षापर्यंत ७५% मानसिक आरोग्याचे प्रश्न सुरु झालेले असतात. ताण तसेच दारू वा इतर काही कारणे आहेत. भारतात तरूणांची संख्या अधिक असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर विदेशातील दारू कंपन्या या तरूणांना जाळ्यात ओढतात. त्यातूनच वैफल्य आणि हिंसा निर्माण होते. व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करतांना श्री. बंग यांनी जगण्याचा आपला उद्देश काय आहे हे समजून घ्या असे मत व्यक्त केले. मानवी मूल्य आणि सामाजिक प्रश्नांप्रती आपली बांधिलकी ठरवा, मी माझ्यापुरते पाहिल ही घातक प्रवृत्ती आहे. लोकसंख्या ही आमची ताकद आहे ती अडचण नाही. असे सांगतांना त्यांनी विविध कौशल्य प्राप्त करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना श्री. बंग यांनी उत्तरे दिली. अध्यक्षीय समारोप प्रा.एस.टी. इंगळे यांनी केला. जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्षअधिकारी प्रवीण चंदनकर यांनी केले.