जळगाव

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

 जळगाव प्रतिनिधी : भारतीय संस्कृती, कला, परंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांची विद्यार्थ्यांना अनुभूती देतानाच ‘करून शिकणे’ या अनुभवात्मक शिक्षणपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे ८ व ९ सप्टेंबर रोजी गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
गिरीश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व महेंद्र कुंभार यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी नैसर्गिक मातीला आपल्या हातांनी आकार देत आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. मातीचा पोत व गुणधर्म समजून घेत तिचे विविध आकारांमध्ये रूपांतर करताना विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती, कलात्मकता आणि सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार केला.
मूर्ती निर्मितीसोबतच गणेशस्तुती, श्लोक व स्तोत्रांच्या सामूहिक पठणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम, निरीक्षणक्षमता, सूक्ष्म शारीरिक कौशल्य, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास यांचा विकास झाला. स्वतःच्या हातांनी गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी मनापासून अनुभवला.
‘मातीपासून मूर्ती आणि मंत्रातून चेतना!’ हा भारतीय परंपरेतील सुंदर विचार या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यात आला. शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळविणे नव्हे, तर संस्कृती अनुभवणे, मूल्ये जगणे आणि सृजनातून स्वतःचा शोध घेणे, हा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्कुलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका निशा जैन यांचे मार्गदर्शन लाभले.
अजय काळे, विक्रांत जाधव, प्राचार्य मनोज परमार यांच्यासह शिक्षिका यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button