प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’
साहित्य आणि सेवा क्षेत्रातील संस्थांना प्रोत्साहन आणि सहकार्य करणे हा आमचा उदात्त हेतू - अशोक जैन
जळगाव दि. २० प्रतिनिधी – प्रभू श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला आज रविवार, दि. २१ रोजी संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. यातून प्रभू श्रीरामलला यांच्या चरणी संगीत नृत्याची सेवा अर्पण केली जाईल.
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजीत व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजीत ‘अवधेय… एक आदर्श’ चे सादरीकरण प्रभाकर संगीत कला अकादमीचे कलावंत करतील. प्रख्यात कवी ग.दि.मा. यांच्या समृद्ध लेखणीतून निर्माण झालेले गीत रामायण आणि त्या गीतांना स्वरसाज चढवला तो प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी, या दोघांनी अजरामर केलेल्या गीत रामायणामधील निवडक आशय प्रधान गाण्यांवर नृत्य दिग्दर्शन करून ‘अवधेय… एक आदर्श’ सादरीकरण केले जाईल. प्रभाकर संगीत अकादमीच्या डॉ. अर्पणा भट यांनी नृत्यसंरचना दिग्दर्शित केल्या असून सुमारे २२ कलावंतांच्या माध्यमातून त्या सादर केल्या जातील. या कार्यक्रमाची प्रकाश योजना रंगकर्मी योगेश शुक्ल सांभाळणार आहेत.
जे जे उत्तम उदात्त म्हणती, ते ते शोधत रहावे जगती’ या धारणेनुसार राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावरील कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्व भवरलालजी जैन यांनी सामाजिक बांधिलकीच्या संस्कारातून सेवाभावी संस्थांची स्थापना केली असून या संस्थांचे कार्य सर्वसमावेशक आहे. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन आणि त्यांचा परिवार हा वसा आणि वारसा पुढे चालवत आहेत. समाजाचं आपण देणं लागतो. त्या ऋणातून उतराई होण्याच्या भावनेतून हे कृतज्ञतापर कार्य सुरू आहे.
“कलागुणांच्या विकासासाठी साहित्य, शिल्प, नाट्य, संगीत, नृत्य, चित्र अशा विविध क्षेत्रातील कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी श्रेष्ठ कवयित्री बहिणाई पुरस्कार १९९१ पासून, श्रेष्ठ गद्यलेखक ना. धों. महानोर १९९२, श्रेष्ठ कवी बालकवी ठोमरे पुरस्कार २००७ तर कांताई साहित्य-कला जीवन गौरव पुरस्कार २०२० पासून महाराष्ट्राच्या विविध भागातील कलावंतांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहेत.
प्रस्तुत पुरस्कार समारंभपूर्वक दिले जातात, नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात त्या व्यासपीठावरून विविध विषयांवर पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि निवड समितीने सदस्यांनी आपली मत मांडलीत. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करणारी संस्था व्यासपीठावरून व्यक्त करण्यात आलेल्या विचारांशी सहमत असतेच असे नाही. व्यासपीठावरून व्यक्त झालेले विचार त्या-त्या साहित्यिकांची वैयक्तिक आहेत, याचा आयोजक आणि प्रायोजक संस्था म्हणून या विचारांना समर्थन नसते.’’ अशी भूमिका अशोक जैन यांनी मांडली.
प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त
जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई
भाविकांना केळी तर सहकाऱ्यांना होणार पेढे वाटप
जळगाव दि. २० प्रतिनिधी – अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार चौक व तीन उद्यानांमध्ये प्रभु श्रीरामांचे प्रतिमांसह आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.
प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी विशेष सजावट लालबहाद्दुर शास्त्री टॉवर, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे करण्यात येत आहे. यासह भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, गौराई उद्यान याठिकाणी आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात येणार आहे. यातून जळगावकरांना दिवाळीची अनुभूती होईल.
लालबहाद्दूर शास्त्री टॉवरवर ८० फुटाची प्रभू श्रीरामांची प्रतिमा
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांची भव्य अशी ८० फुट उंचीची प्रतिमा जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या लालबहाद्दुर शास्त्री टॉवरवर साकारली आहे. ही प्रतिमा भारतातील सर्वात मोठी असेल. यानंतर स्वातंत्र्य चौकात ३० फुट तर आकाशवाणी चौकात ४० फुटांचे प्रतिमा उभी करण्यात आली आहे. या प्रतिमेतून प्रभू श्रीरामाचे विराट दर्शन होत आहे.
५१ मंदिरांमध्ये भाविकांना केळी प्रसाद वाटप
जैन इरिगेशनतर्फे शहरातील जवळपास ५१ मंदिरांमध्ये केळी वाटप केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठादिवशी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना केळी प्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी शिवराज्याभिषेक लोकोत्सव समिती महाबळ उपनगर यांचे सहकार्य असेल.
दर्शन प्रभू श्रीरामांच्या विचारांचे…
काव्यरत्नावली चौकामध्ये सण-उत्सव व महापुरूषांच्या जयंती दिनी विशेष सजावट केली जाते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्रीरामाची १६ फुट प्रतिमेचे आणि सोबत ५ फुटी चार दिवे हे आकर्षक असेल यासह रोषणाई असेल “दर्शन.. वत्सलतेचे, मातृ-पितृ भक्तीचे! दर्शन.. त्याग, सत्यवचन, संस्कृतीचे! आदर्श संस्कार मर्यादेचे, पुरूषोत्तमांच्या सहिष्णुतेचे!” या संकल्पनेवर आधारित विशेष सजावट करून प्रभू श्रीरामांचा आदर्श आपल्या जीवनात आचरणाचा संदेश दिला जाणार आहे. ही सजावट जैन इरिगेशनच्या कलाविभागातील सहकारी जगदीश चावला व सहकाऱ्यांनी साकारली आहे.
जैन इरिगेशनच्या १३ हजाराहून अधिक सहकाऱ्यांना पेढे वाटप…
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या १३ हजारहून अधिक सहकाऱ्यांना पेढे वाटप करण्यात येणार आहेत.
स्नेहाच्या शिदोरीत ड्रायफूट शिरा
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त कांताई सभागृह येथे वाटप होणाऱ्या ‘स्नेहाच्या शिदोरी’ सोबत ड्रायफूट शिरा दिला जाणार आहे.
अशोक जैन अयोध्येला रवाना…
श्रीराम मंदीर परिसरात प्राणप्रतिष्ठा सोहळा हा सात अधिवासांमध्ये होत आहे. देशातील जवळपास १२५ परंपरांचे संत-महापुरूष व भारतातील सर्व शाखीय २५०० श्रेष्ठ पुरूषांची उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हेही निमंत्रीत आहेत. ते आज अयोध्याला रवाना झालेत. ते श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ५० लाख भाविकांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.