८१ व्या वर्षांची खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची यशस्वी वाटचाल
16 सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचं भव्य आयोजन

दिनांक – १४ / ०९ / २०२५ जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९४४ मध्ये झाली.सुरवातीला विद्या प्रसारक संस्थेच्या वास्तुत १९४४ ते १९४९ पर्यंत होती. त्यानंतर दानशूर मूळजी जेठा यांनी दिलेल्या जागेत संस्था उभी राहिली. सर्वांना शिक्षण देण्याच्या उद्देशानं “ज्ञान प्रसारो व्रतम” या ब्रीद वाक्याने शिक्षण प्रसारण करण्यास वचनबद्ध असलेली एक संस्था म्हणून जळगाव (महाराष्ट्र) येथे या संस्थेची स्थापना झाली.
उत्तर महाराष्ट्रात मुंबईच्या ईशान्यपासून चारशे किलोमीटर अंतरावर स्थित असलेली एक आघाडीची शिक्षण संस्था म्हणजे खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी ज्ञानाच्या, प्रगती आणि प्रसारासाठी ही संस्था कार्यरत आहे. विविध सामाजिक स्तरातून उत्तम कारकीर्द घडविण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, विविध भाषा, उदारमतवादी, कला, मानसिक, नैतिक आणि मानवी तसेच नैसर्गिक विज्ञान, शिक्षणशास्त्र, व्यवसाय प्रशासन आणि व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि संगणक,विज्ञान अशा विस्तृत शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमातून येथे ज्ञान दिले जाते. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी सत्तावीस एकर क्षेत्रावर विस्तारलेली आहे, ज्यात वीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील ८० वर्षांपासून अविरत शैक्षणिक कार्य सुरू असून ही संस्था आता शैक्षणिक क्षेत्रात प्रगल्भता प्राप्त झालेली आणि संशोधनाचं माहेरघर असणारी संस्था आहे. “नॉलेज इज पॉवर” या ठाम विश्वासाने एक प्रगल्भ शैक्षणिक चळवळ म्हणून नावाजलेली संस्था आहे. १९४५ ला के सी ई सोसायटीद्वारे मुळजी जेठा महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. एकलव्य हे अद्ययावत भव्य क्रीडा संकुल आहे, ज्यात व्यायामशाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव सर्व सुविधांसह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. महाविद्यालयातील बऱ्याचशा माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवलेला आहे. गौरवाची बाब म्हणजे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या देखील याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत व त्या राष्ट्रपती पदावर असतांना केसीई संस्थेला उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते.व्यवस्थापन आणि चांगल्या शिक्षणाची अपेक्षा म्हणून संस्थेने १९८६ साली महाविद्यालयात व्यवस्थापन आणि शोधन विभाग सुरू केला आणि परंपरेनुसार विभागाने देखील ही प्रगतीशील प्रतिमा कायम ठेवली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून त्यास मान्यता मिळाली आहे, तसंच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी ते संलग्नित आहेत.
शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि व्यवसाय व्यवस्थापन, संगणक विनियोग आणि व्यवसाय व्यवस्थापन, आयात निर्यात, व्यवस्थापन, संगणक आज्ञावली या विस्तृत श्रेणीचे अभ्यासक्रम, पदव्युत्तर कार्यक्रम आणि अभ्यासक्रम ते राबवित आहेत. संस्था नेहमीच परिणामवाचक तंत्रप्रणाली, व्यवस्थापन, माहिती प्रणाली तसेच व्यवस्थापनासाठी आंतरसांस्कृतिक दृष्टीकोणाचा सकल वापर करण्यावर भर देते. मुळजी जेठा महाविद्यालयाने स्वायत्त दर्जा प्राप्त केलाय. आधी कळस नंतर पाया याची उक्ती संस्थेच्या पी जी टू के जी ही शैक्षणिक प्रगती बघताना दिसून येते. १९४५ मधे मुळजी जेठा महाविद्यालय, १९६५ शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, १९७० एस. एस. मन्यार लॉ कॉलेज, १९८६ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च कॉलेज, १९८६ किलबिल बालक मंदिर,गुरुवर्य परशुराम विठ्ठल पाटील प्राथमिक शाळा, ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, १९९७ ओरिऑन इंग्लिश मीडियम स्कूल (स्टेट बोर्ड), २००४ एकलव्य क्रीडा संकुल, २००५ अध्यापक विद्यालय,सोहम योगा अँड नेचुरोपैथी २००६ जलश्री वॉटरशेड सर्व्हलन्स अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, २००१ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, २००७ ओजस्विनी कला महाविद्यालय, २००९ स्पार्क इन्स्टिट्यूट ऑफ मल्टिमीडिया अँड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, २०१० ओरिऑन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल, २०१० पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड रिसर्च तसंच ज्ञानज्योत इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पेटेटिव्ह एक्सलन्स आणि २०१८ डॉक्टर अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि कान्ह ललित कला केंद्र जिथे संगीत,चित्रकला,नृत्य,नाट्य अश्या सप्त कलांचे दालन हा विस्तार आता वाढता आहे. मागील पाच वर्षात आयएमआर,इंजिनीअरिंग,मुलांचे वसतिगृह ,लाँ कॉलेज,आणि सुसज्ज ५०० प्रेक्षक क्षमता असलेले नाट्यगृह अशी विशेष कामगिरी झाली आहे.
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे आणि संचालक मंडळ सतत खान्देशातील नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन, समाजाभिमुख आणि विद्यार्थी केंद्रित, रोजगाराभिमुख आणि कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम राबविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. संस्थेच्या शैक्षणिक आणि वैचारिक जडणघडनीत देशातील अनेक नामवंतांचे संस्कारमय विचारसिंचन संस्थेला लाभले आहेत. त्यामध्ये सर्वश्री माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, माजी उपप्रधानमंत्री यशवंतराव चव्हाण, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर,अभिनेते पृथ्वीराज कपूर, प्राचार्य राम शेवाळकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आचार्य रजनीश, पद्मश्री पी. टी. उषा, इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन आणि शुभचिंतन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीला लाभले आहे. येणाऱ्या काळात संस्था शोध, माहिती तंत्रज्ञानावर भर देऊन शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच संस्थेअंतर्गत उत्साही महत्त्वाकांक्षी वातावरण निर्माण करून आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्तरित्या शोधन करण्याचा प्रयत्न आहे.
१९४४ मध्ये स्थापित, केसीई सोसायटी महाराष्ट्रातील एक नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. गेल्या आठ दशकांपासून, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या ध्येयावर संस्था ठाम आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२०नुसार, केसीई सोसायटी आता अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार आणि योग विज्ञान यांसारख्या विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे. हा प्रवास आता ८१ वर्षांचा झाला. त्या निम्मताने दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता, केसीई संस्थेच्या प्रांगणात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचे योजिले आहे.असे प्रथमच होत आहे कि केसीई च्या सर्व संस्था मिळून एकाच दिवशी एकच वेळेस त्यांची आत्तापर्यंतची सुरु असलेली वाटचाल विविध अंगाने मांडत आहेत.या कार्यक्रमात एकूण १७ कार्यक्रम होत आहेत.
या कार्यक्रमासाठी क.ब.चौ.उ.म.वि.चे मा.कुलगुरू विजय माहेश्वरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. विशेष अतिथी म्हणून मा.उप कुलगुरू एस.टी.इंगळे उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या कार्याचा आणि वाटचालीचा परिचय देणारी चित्रफीत सादर करण्यात येणार असून त्याच्यातून संस्थेच्या गौरवशाली इतिहासाची झलक बघायला मिळणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष अँड़.श्री. प्रकाश पाटील भूषवणार आहेत..