जळगाव

१९ वर्षीय युवकाचा शेततळ्यात पाय घसरून मृत्यू

मृत्यूने गावात पसरली शोककळा

उमेश महाजन, आवाज मराठी एरंडोल। ११ जुलै २०२३ । एरंडोल तालुक्यातील विखरण येथील १९ वर्षीय युवकाचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. पिंपळकोठा शिवारात ही घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विखरण येथील तेजस रवींद्र अहिरे (१९) हा युवक सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या पिंपळकोठा शिवारातील शेतात गेला होता. शेतात असलेल्या शेततळ्याजवळ त्याचा पाय घसरल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. तेजस हा शेततळ्यात पडल्याचे समजतात परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. ग्रामस्थांच्या मदतीने तेजस यास शेततळ्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे आणले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. तेजस याचे वडील खासगी शाळेत शिपाई असून त्यांच्या पश्चात आई- वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. तेजसच्या अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुलाब निंबा सोनवणे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button