डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयात नवीन तंत्रज्ञान कौशल्य अभियान कार्यक्रम
आवाज मराठी, जळगाव (प्रतिनिधी) :- येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सेंटर फॉर इन्नोवेशन, इनक्यूबेशन व लिंकेजस् (KCIIL) जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन तंत्रज्ञान कौशल्य अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कबचौउमवि, जळगांवच्या KCIIL चे संचालक प्रा. भूषण चौधरी व KCIIL चे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील उपस्थित होते. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे यांनी विद्यार्थीनींना आर्थिक स्वावलंबन व स्वयं रोजगार प्राप्त करण्यासाठी सदरील कार्यक्रम उपयुक्त ठरेल अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुजाता गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रामध्ये प्रा. भूषण चौधरी यांनी नवीन तंत्रज्ञानामध्ये कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन करतांना काळानुरूप आपल्याला विविध विषयाचे नवीन तंत्रज्ञान जसे – कोडिंग, प्रोग्रामिंग, आयटी मैनेजमेंट, वेळेचे नियोजन, स्वीकार करण्याची वृत्ती, समस्येची उकल करणे, नेतृत्व गुण इत्यादी कौशल्य आत्मसात करावे लागतील असे सांगितले. विद्यार्थीनींनी कुणाचे अनुकरण न करता आपल्या आवडीने कौशल्य निवडून आत्मसात करावे, इलेक्ट्रॉनिक्स, आय टी तंत्रज्ञान, कृषी, मैनेजमेंट, प्रसार माध्यम व मनोरंजन, ब्यूटी व वेलनेस, हेल्थ केयर, इत्यादी क्षेत्रामध्ये रोजगार व संधी अधिक उपलब्ध आहेत.
माइंड मैपिंग कोर्स, भावनिक बुद्धिमत्ता, इंटरनेट मार्केटिंग, नेतृत्वगुण, सेल्स प्रो. फ्यूचर ऑफ टेक्नालॉजी डाटा सायंस इत्यादी कोर्सेसच्या माध्यमातून आपण कौशल्य आत्मसात करू शकतो, तसेच या कौशल्याद्वारे आपण स्वतंत्र उद्योग ही करू शकतो, असे त्यांनी सांगितले. तर दुस-या सत्रामध्ये श्री. सागर पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव च्या इनक्यूबेशन सेंटर तसेच इनक्यूबेशन प्रोग्राम प्रक्रिया , इन्नोवेशन, KCIIL द्वारे उद्योगासाठी केले जाणारे अर्थसहाय्य, यासंबधी माहिती दिली. तर कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी कबचौ उमवि, जळगावच्या स्कूल आफ केमिकल सायंसचे डॉ. विकास गिते यांनी सांगितले की काळानुसार आज रोजगार प्राप्त करण्यासाठी आपल्या जवळ कौशल्य असणे गरजेचे आहे. तसेच आपल्या कौशल्यातून आपण उद्योग सुरू करून इतरांना रोजगार देऊ शकतो. सलोनी मावची व अलिया रंगरेज यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते संबंधी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिताली अहिरे यांनी तर आभार डॉ. अशोक पाटील यांनी मानले.