
चोपडा -शहर पोलीस चोपडा ते शिरपूर रस्त्यावरील अकुलखेडा टोल नाक्याजवळ नाकेबंदी करत असताना पुणे येथील आकाश गणेश चव्हाण या युवकाकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस आढळून आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई २३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलिस २३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चोपडा ते शिरपूर रस्त्यावरील अकुलखेडा टोल नाक्याजवळ नाकेबंदी करत होते. या वेळी पुणे शहरातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला आकाश गणेश चव्हाण (वय २४, ह.मु. वाल्मिक नगर, पनवेल, नवी मुंबई) हा दुचाकी (एमएच १४ केएल ४३०३) ने चोपड्याकडे येत असताना त्याला पोलिसांनी अडवले. या वेळी त्याच्याकडे २५ हजाराचा एक गावठी कट्टा व दोन हजार किमतीचे २ जिवंत काडतूस, ५० हजारांची दुचाकी असा एकूण ७७ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. त्यावरून चोपडा पोलिसांनी आकाश चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्यावर चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.