जळगाव शहरातील घटना
टीम आवाज मराठी,जळगाव दि. 11 ऑक्टोबर 2024 -पंचमुखी हनुमान मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या रणछोड नगर परिसरात एका ५७ वर्षीय महिलेची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. मृत महिला सुवर्णा नवाल, या घरी एकट्या असताना त्यांच्यावर डोक्यात कठीण वस्तूने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी सायंकाळी सुवर्णा यांचे पती राजेश नवाल हे दाणाबाजारातील धान्याच्या दुकानात गेले होते. रात्री ९ वाजता ते घरी परतले असता, सुवर्णा नवाल या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. तात्काळ त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, आणि एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस पथकासह दाखल होत तपास सुरू केला आहे.
सुवर्णा नवाल यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.