
टीम आवाज मराठी, चाळीसगाव दि. 05 ऑक्टोबर 2024 – शस्त्रांचा धाक दाखवून तालुक्यातील हिंगोणे येथे19 बकऱ्या लुटून नेणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाड केली असून त्यांच्याकडून एक लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की हिंगोणे गावात एका शेडमध्ये 19 बोकड आणि सात बकऱ्या बांधलेल्या असताना चार चाकी वाहनातून आलेल्या टोळीने लुटून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता . मात्र ही चोरी भवाळी गावातील चेतन गायकवाड याने केल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने गुरुवारी ३ ऑक्टोबर रोजी भवाळी गावात जाऊन चेतन गायकवाड व त्यांचे साथीदार यांना ताब्यात घेऊनत्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही चोरी चेतन गायकवाड यांच्यासह त्याचे साथीदार गोरख फकीरा गायकवाड, बबलू आबा जाधव, गोरख सुरेश गोकुळ, सोमनाथ भिकन गायकवाड, गोकुळ गायकवाड आणि शंकर मोरे सर्व रा. भवानी ता. चाळीसगाव यांनी केल्याचे समोर आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. यातील गोकुळ गायकवाड आणि शंकर मोरे हे दोघे पसार झाले.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि रोकड असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, हिरालाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दीपक चौधरी यांनी केली आहे.
अटकेतील पाचही जणांना पुढील चौकशीसाठी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.