जळगावदेश-विदेशमुंबईराजकीय

800 यात्रेकरु ‘भारत गौरव पर्यटन रेल्वेने अयोध्येकडे रवाना

जळगाव – मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 800 यात्रेकरुंची विशेष वातानुकुलीत ‘भारत गौरव पर्यटन रेल्वे’ अयोध्येकडे सोमवारी 30 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात, ढोल ताशांचा गजरात, पारंपारिक नृत्य करून यात्रेकरूंच्या स्वागतात खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते फीत कापून यात्रेकरूंचा रेल्वेत प्रवेश झाला.

 

खासदार स्मिता वाघ, आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी महापौर सिमा भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी श्री. अंकित, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, माजी नगरसेवक उज्वला बेंडाळे यांनी झेंडा दाखवून ही स्पेशल ट्रेन जळगाव स्टेशनवरून अयोध्येकडे रवाना झाली.

ढोल, तासे, उत्सव कमानीने यात्रेकरूंचे स्वागत

जळगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वर सकाळी लवकर सजावटीसह वातानुकुलीत ‘भारत गौरव पर्यटन रेल्वे सज्ज होती. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेची स्वागत कमान लावण्यात आली होती. रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने अयोध्या दर्शनासाठी जात असल्यामुळे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभुषेत कलाकार मंचावर होते, पारंपारिक नृत्य केले जात होते. असे सगळ्या महोत्सवी वातावरणात यात्रेकरू त्यांना दिलेल्या बोगीत बसून आनंद व्यक्त करत होते.

शासन निर्णय १४ जुलै २०२४ अन्वये राज्यातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील एकुण ७३ तर महाराष्ट्र राज्यातील एकुण ६६ तिर्थस्थळांचा समावेश आहे. या योजनेसाठी जळगांव जिल्हयाला एकुण १००० उदिष्ट होते. सदर योजनेअंतर्गत पहिल्या टप्यासाठी श्रीराम मंदिर, अयोध्या हे स्थळ निश्चीत करण्यात आले. या योजनेसाठी जिल्हयातुन एकुण ११७७ अर्ज प्राप्त झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना जिल्ह्याचे समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून एकुण ८०० लाभार्थीची या योजनेसाठी लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी आय.आर.सी. टी .सी यांच्यासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार वातानुकुलीत ‘भारत गौरव पर्यटन’ ही विशेष रेल्वे करण्यात आली. ही रेल्वे जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी मार्गे अयोध्येकडे जाणार आहे. ही रेल्वे 1 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजता आयोध्येत पोहचणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी यात्रेकरू रामललाचे दर्शन घेतील. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी रात्री जळगावकडे ही रेल्वे निघेल. जळगाव येथे 4 ऑक्टोबर रोजी सकाळी पोहचेल अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली.

आय.आर.सी. टी.सी कडून व्यवस्था

यात्रेकरूंना पाणी,चहा, बिस्कीट, नाष्टा, जेवण ही व्यवस्था त्यांच्याकडून असेल. तसेच आयोध्येत राहण्याची व्यवस्था पण आय.आर.सी. टी .सी करणार आहे. यात्रेकरूंना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदार( सर्वसाधारण ) सुरेश कोळी आणि त्यांच्या सोबत वैद्यकीय पथक, इतर सहायक अशी टीम सोबत असणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चित्रफितीच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत आयोध्यासाठी निघालेल्या यात्रेकरूंना शुभेच्छा देऊन जिल्हा प्रशासनाने अत्यंत व्यवस्थितपणे या यात्रेचे नियोजन केल्याबद्दल कौतुक केले.

मंत्री, खासदार, आमदार यांनी दिल्या शुभेच्छा

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्ह्यातील सर्व आमदार यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेसाठी निघालेल्या जिल्ह्यातील सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा कळविल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button