आवाज मराठी जळगाव दि,25-9-24-परिवर्तनचा उपक्रम “लेखकाचे अभिवाचन” या उपक्रमात मराठीतील महत्त्वाचे समकालीन कवी अशोक कोतवाल यांच्या कवितांचे अभिवाचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अशोक कोतवाल यांनी आपल्या कवितांनी रसिकांच्या मनाचा ताबा घेतला आणि अनेक कवितांचं अभिवाचन करून हा कार्यक्रम गाजवला. परिवर्तन जळगावच्यावतीने लेखकाचे अभिवाचन हा उपक्रम दर महिन्याला महावीर क्लास येथील हॉलमध्ये हा उपक्रम राबवला जातो. लेखकाची ओळख व्हावी लेखकाच्या साहित्याचा परिचय व्हावा आणि एखाद्या समीप नाट्याचा अनुभव यावा असं या कार्यक्रमाचे स्वरूप असतं. या कार्यक्रमात सुरुवातीला प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. कीर्ती देशमुख यांनी अशोक कोतवाल यांचा परिचय करून दिला तर दुस-या प्रमुख लीना लेले यांनी अशोक कोतवालांच्या साहित्याचे वैशिष्ट्य उलगडून सांगितलं. यानंतर आनंद मलारा व शशिकांत हिंगोणेकर यांनी अशोक कोतवालांचे स्वागत आणि सत्कार केला आणि मग कवितांचा एक सुंदर प्रवास सुरू झाला. पांथस्थ दगड, दुःखाच्या दोन लाडक्या बहिणी, मराठी शाळा बंद पडताये,त का रडतायेत मुली, मुलीच नदी होऊन मुलगी आई होते तेव्हा, आमच्या मुली शिकता आहेत, मुली, मधल्या सुट्टीत पळून जाणा-या मुलांचे मनोगत, अशा अनेक कवितांनी अशोक कोतवाल यांनी सगळ्या रसिकांचं मने जिंकून घेतली. मुळात अशोक कोतवाल यांची कविता ही संवादी कविता आहे. वैयक्तिक नातं आणि सामाजिक परिस्थिती यावर भाष्य करणा-या या कवितेने सर्वजण अगदी तृप्त झाले.
नंदलाल गादिया, नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, अंजली पाटील, श्वेता पटवे, विनोद पाटील, अमर भाई कुकरेजा, अस्मिता गुरव, सत्यजीत साळवे, जितेंद्र कुवर, उदय सपकाळे, राजू बाविस्कर, यशवंत गरुड, मोना निंबाळकर असे अनेक रसिक उपस्थित होते.