जळगाव

“आपल्या घराचे स्वत: तीर्थंकर बना” – प.पू. प्रविणऋषीजी म.सा.

रतनलाल सी बाफना स्वाध्याय भवन येथे 'ब्लिस फूल कपल कॅम्प'चे आयोजन केले

 

‘कुठल्याही व्यक्तीला, दोषाला सुधारण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती, कडक अनुशासन करणारे गुरुजन, आई-वडील त्याला वाईट दिसतात हे वास्तव आहे. आपले ज्याच्याशी वैर आहे त्याविषयी आपण जेवढा क्रोध करत नाही तेवढा आई-वडील, सासू-सासरे यांच्याविषयी करतो. मारलेली ‘थप्पड’ लक्षात राहते मात्र प्रेमाने दिलेली ‘थप्पी’ हे लक्षात राहत नाही. त्यासाठी चांगले व्यक्तिमत्व घडवणाऱ्या व्यक्ती, गुरुजनांचा आदर करा, त्यांना सदाचारासाठी सहकार्य करा. आपले वर्तन सुधारणारे आणि बिघडवणारे आपणास भेटतात. त्यांच्याकडून आपण काय घेतो हे महत्त्वाचे आहे. करणे, करून घेणे हा खूप मोलाचा विचार आहे. चांगल्या धर्मगुरूंचा सहवास आपल्या जीवनात शांतीचा मार्ग दाखवतो. सजग, दक्ष असा शिष्य, मुलगा, सून मिळण्यासाठी कुणाच्या क्रोधाचे कारण न होता, क्रोध वाढेल असेल वर्तन करू नये, यातून विश्वात क्रोध नाहिसा होईल.

जो मृत्यूसाठी तयार होतो तोच मारण्यासाठी पुढे येतो, असा समाज आपण निर्माण करतोय मात्र क्षमा करणारे, नम्रता ठेवणारी पिढी तयार करू शकलो नाही. जीवनात कुणापुढे नतमस्तक व्हावे लागले तर विवेकपूर्ण व्हावे. आपल्या नजरेत दुसऱ्यांविषयी प्रेम, आपुलकी, कृपादृष्टी असावी त्यात क्रोधचा आवेश नसावा. चांगले करून घेण्याचे सामर्थ्य ज्यांच्यात आहे त्या श्रीकृष्णासारखे सारथी बना. नाहीतर शकुनी ज्याठिकाणी बसतात त्याठिकाणी धर्मराजाकडूनही अघटित होऊन जाते.

धर्मगुरू, त्यांचे विचार ज्याठिकाणी असतात त्याठिकाणी एकमेकांचा तिरस्कार करणारेसुद्धा एकाच छताखाली शांत असतात. त्याप्रमाणेच प्रत्येक घरात आई-वडीलांनी ज्ञान, दर्शन समवशरण सहित तीर्थंकर बनले पाहिजे. आपली उपस्थिती इतकी सामर्थ्यशाली असली पाहिजे की न बोलतासुद्धा क्रोध शांत झाला पाहिजे. आई-वडीलांचे हात मुलांच्या डोक्यावर आशिर्वादासाठी असावे ते ‘शुभंकर’ की ‘भयंकर’ हे स्वत: ठरवावे. ज्या क्षणावेळी सूखाची सृष्टी निर्माण करता येऊ शकते त्या क्षणांना भयभीत केले जाते तशी कृती आपल्याकडून घडते. आपण फुलांना जवळ ठेवायचे की काट्यांना हे प्रत्येकाने स्वत: ठरवले पाहिजे. घरात तीर्थंकर, चक्रवती, वासुदेव याप्रमाणे आचरण केले पाहिजे. आपण दीपक बनावे डायमंड नाही. दिपकप्रमाणे ऊर्जावान बनावे ज्याने उत्तम समाज घडेल.

वृक्षसुद्धा फळं देते आणि कर्मसुद्धा, वृक्षाचे फळं देतात वृक्षांकडून आलेल्या फळाची चव आपण घेऊ शकतो मात्र कर्माचे फळ हे आपल्याजवळ नसते याचे भान ठेवावे. लेश्या शुध्द असावी, द्रव्य लेश्या त्यात वर्ण, गंध, रस, स्पर्श आहे आणि भव लेश्या त्यात ज्ञान, दर्शन, चरित्र आहे. भाव लेश्या चिरंतन असते तर द्रव्य लेश्या ही दृश्यस्वरूपाची असते. त्यामुळे घरातील अस्तित्व त्या घराचे भाग्य बदलवित असते. दुधात मीठ टाकले तर ते खराब होते मात्र तेच मीठ जर दही, ताक मध्ये टाकले तर त्याचा स्वाद वाढतो त्याप्रमाणे आई-वडीलांचे कार्य आहे.’ असे श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर पूज्य गुरूदेव प्रवीणऋषीजी म. सा. यांनी सांगितले.

रतनलाल सी बाफना स्वाध्याय भवन येथे ‘ब्लिस फूल कपल कॅम्प’चे आयोजन केले असून आनंदी दाम्पत्य शिबीरात ते बोलत होते. दि. ६ फेब्रुवारी पर्यंत सकाळी ९ ते १० यादरम्यान वैवाहिक जीवनातील सहयात्रेचे लक्ष्य आणि रहस्य समजावून ध्यान, ज्ञान, चारित्र्य आणि नातेसंबंधावर प्रकाश टाकला जात आहे. या कार्यशाळेत सर्वांनी अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन संघपती श्री दलिचंदजी जैन यांनी ‘श्री संघा’तर्फे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button