एरंडोल- नागदुली गिरणा नदीपात्रातील सुकेशन बंधाऱ्यातून अवैध वाळूचा उपसा
स्थानिक पोलिसांचे हेतु पुरस्कर दुर्लक्ष.
टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक १ नोव्हेंबर २०२३ | एरंडोल तालुक्यातील नागदुली येथील गिरणा नदी पात्रातील सुकेशन बंधारा येथील मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. यामुळे धरण व नदीपात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून ते गावकऱ्यांसाठी जीव घेणे ठरत आहे.
शासनातर्फे वाळू लिलाव बंद असतांना देखील वाळू माफियांतर्फे सुरू असलेल्या या अवैध उपसाकडे स्थानिक पोलीसांनी हेतु पुरस्कर दुर्लक्ष केले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून वाळू उपसा थांबवावा, अशी मांगणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. या वर्षी गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू वाहून आली असल्याने येथील सुकेशन बंधारा येथे वाळू माफियांना जणू पर्वणीच लाभली आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करत ट्रॅक्टर व मिळेल त्या वाहनातून बंधाऱ्यातून उपसा करत वाळू लांबवली जात आहे. यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईशी ग्रामस्थांना सामना करावा लागणार आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी होणारे खड्डे जीवघेणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गिरणा नदीतील सुकेशन या बंधाऱ्यातून सुरू असलेल्या या वाळू चोरी संदर्भात स्थानिक पोलिसांनी वाळू माफियांविरूध्द कोणतीच कारवाई केली नसल्याने त्यांचे वाळू माफियांशी असलेले लागेबांधे दिसून येत असल्याचा आरोप आता संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. गिरणा नदी पात्रातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील वाळू उपशामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू चोरीमुळे माफियांचे फावले आहे. तर शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत असून याची प्रशासना कडून दखल घेऊन त्वरीत वाळू चोरट्यांविरूध्द कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.