
आत्माराम पाटील | आवाज मराठी, चोपडा | दिनांक १७ सप्टेंबर २०२३
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील यावल बसस्थानक परिसरात शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चक्क सात दुकाने व लक्ष्मी नगरातील एक बंद घर फोडून ऐवज लंपास केल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे.घटनेची माहीती अडावद पोलीसांना देऊनही त्यांनी तपास करने तर दुरच मात्र साधी घटनास्थळी येण्याचीही तसदी न घेतल्याने एवढ्या मोठ्या घटनेचे काहीएक गांभीर्य नसल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये मध्ये संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की शुक्रवारी रात्री पाऊस सुरू होता व विजपुरवठाही बंद होती याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी यावल बसस्थानक परिसरातील अमरदीप गुजर यांचे सुर्यवंशी टी सेंटर, रावसाहेब पाटील यांचे सातपुडा कृषी केंद्र , राजेंद्र चौधरी यांचे कांचन प्रिंटर्स जनरल स्टोअर्स , अडावदकरांचे जनता फ्रुट कंपनी व सदगुरू दुध उत्पादक सोसायटीचे कार्यालय, या सर्व दुकानांचे टॉमीने कुलुपे तोडून रोख रक्कम, चिल्लर तर लक्ष्मी नगरातील गोकुळ कुंभार यांचे बंद घरात चोरी केल्याची घटना घडली.यात अनेक दुकानदारांच्या दुकानातील चिल्लर तसेच सुर्यवंशी टी स्टॉल मधुन दोन हजार रूपये व सिगारेटचे पाकीटे असा ऐवज चोरांनी लंपास केला. ईतर दुकानातील काय ऐवज चोरीस गेला ते कळू शकले नाही .ही घटना शुकवार रात्री घडली या वेळेत विजमंडळाचा विज पुरवठा बंद होता तर सततधार पाऊसही सुरु होता. सकाळी ४वा .प्रशांत अंबादास महाजन हा दुध काढणेसाठी जात असतांना त्याच्या लक्षात सदर घटना आलेवर त्याने दुकानदारांना कळविले.व दुकानदारांनी आपल्या दुकानांकडे धाव घेत पोलीस पाटील रविंद्र कोळी यांना ही माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येत पाहणी करुन याची माहिती तात्काळ अडावद पोलीस ठाण्याला कळवली मात्र सात ते आठ दुकानांचे कुलूप तोडून चोरीची गंभीर घटना घडूनही पोलिसांनी या गंभीर घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चोऱ्या झालेल्या ठिकाणी साधी भेट देऊन पाहणी वा विचारपूस करणेचीही तसदी घेतली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.परिसरात चोऱ्यांचे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे म्हणून पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
