टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक २७/८/२०२३
निसर्ग कवी म्हणून अवघ्या देशाचे सुपरीचित व्यक्तिमत्व म्हणजे ना. धों. महानोर. शेती-वाडी, पाणी, कविता, वही गायन आणि निसर्गात रमणारे कवी व लेखक म्हणून त्यांना सर्वच ओळखतात. ‘हिरवाई अन् निळाई जगलेल्या…’ निसर्गाशी एकरूप झालेल्या महाकवींंच्या त्यांनी लिहलेल्या कविता, गितांमधून कलावंतांनी हृदय आठवणी जागवल्या.
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्यातर्फे ‘हिरवाई अन् निळाई जगलेले…’ या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आले होते.
याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर जयश्री महाजन, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विवेकानंद कुळकर्णी, ना. धों. महानोर यांचे चिरंजीव, बाळासाहेब महानोर, गोपाळराव महानोर यांच्याहस्ते कविवर्य ना. धों. महानोर यांच्याहस्ते प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले. यानंतर सर्वांनी कविवर्य ना. धों. महानोरांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, यांच्यासह ना. धों. महानोर कुटुंबीय उपस्थितीत होते.
एक होता विदूषक या चित्रपटातील ना. धों. महानोर यांनी रचलेल्या ‘शब्दांचा हा खेळ मांडला..’ हे गीत ऐश्वर्या परदेशी, वैशाली शिरसाळे यांनी गाऊन श्रद्धांजलीपर मैफलची सुरवात केली. नभ उतरू आलं.. घन ओथंबून.. ह्या सुमधुर गीतांच्या सादरी करण्यातून रानकवींचे गारूड आजही मराठी मनावर असल्याशी साक्ष दिली. जैत रे जैत या चित्रपटातील आम्ही ठाकरं ठाकरं.., मी रात टाकली… ही गाणी वैशाली शिरसाळे, अथर्व मुंडले, वरूण नेवे यांनी सादर केलीत. बाळगू कशाला व्यर्थ…, लिंगोबाचा डोंगर… भूळ पिकल्या… राजसा जवळी जरा बसा… चिंब पावसानं… दूरच्या रानात… भरलं आभाळ… द्यावे आलिंगन… निघाली पालखी.. मी गाताना.. अशी अजरामर झालेली एकाहूनएक सरस गीतांनी कविवर्य महानोर यांना कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
पद्मश्री ना. धों. महानोर हिरवाई अन् निळाई जगलेले ह्या कार्यक्रमात ऐश्वर्या परदेशी, वैशाली शिरसाळे, अथर्व मुंडले, वरूण नेवे व दीपक चांदोरकर यांनी गीतांचे सादरीकरण केले. सुसंवादीनी म्हणून पूर्वाश्रमीच्या जळगावच्या व सद्यस्थितीत पुणे येथे स्थायिक असलेल्या आकाशवाणीच्या निवृत्त ज्येष्ठ उद्घोषीका डॉ. प्रतिमा विश्वास यांनी साथसंगत दिली. प्रतिमा विश्वास यांनी जळगाव, भवरलाल जैन व ना.धों. महानोर यांचे मैत्रीमधील आठवणी उलगडून दाखवली.
सुरवातीला दीपक चांदोरकर यांनी गुरूवंदना सादर केली. दीपिका चांदोरकर यांनी सूत्रसंचालन केले.