टीम आवाज मराठी, नंदुरबार। २२ जून २०२३ । भारताची अर्थव्यवस्था जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. महिला, युवक, शेतकरी, अनुसूचित जाती -जमाती, सवर्ण, गरीब आदी घटकांच्या सहकार्याने प्रधानमंत्री मोदी देशाचा विकास करीत असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय यांनी नंदुरबारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ९ वर्षाच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध विकास योजना, विकास कामे याबाबत माहिती देण्यासाठी भाजपातर्फे अभियान सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपा गोवा प्रभारी खा. विनय तेंडूलकर, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित, आ. राजेश पाडवी, आ. जयकुमार रावल, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कोवीड संकटाच्या काळात जगाची आर्थिक व्यवस्था ढासळली असतांना भारताची अर्थव्यवस्था जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, हि गर्वाची बाब असून भारताची जीडीपी आता विकसित राष्ट्रांमध्ये सर्वात जास्त असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. दळणवळणाच्या क्षेत्रात रस्ते असो वा रेल्वे मार्ग भारताने विकास साधला असून देशातील १ लाख ९० हजार गावे इंटरनेटशी जोडली गेली आहेत. मोदीजींच्या सबका साथ सबका विकास या घोषणेनुसार सर्व गरीब वर्गासाठी कोणतेही भेद न ठेवता सर्व योजनांचे वितरण करण्यात आल्याचं विजयवर्गीय यांनी सांगितलं.
घरकुल योजनेअंतर्गत ३ करोड लोकांना घरे देण्यात आली आहेत. कोविड काळात ८० कोटी लोकांना प्रत्येकी पाच किलो धान्य दिले गेले. ही योजना आताही सुरू आहे. देशात १४० कोटी लोकांचे कोविळ लसीकरण झाले आहे. ही संख्या जगातली सर्वात मोठी आहे. जनधनच्या माध्यमाने ४६ कोटी लोकांचे खाते उघडण्यात आले. सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते आहे. किसान सन्मान निधीचा लाभ सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो आहे.
भारतामुळे योग संपूर्ण जगात गेला आहे. योगाद्वारे जगातील ३० कोटी लोक जोडली गेलेली आहेत. एक लाख योग गुरूंना रोजगार मिळाला आहे.देशातील उज्वला योजनेअंतर्गत १० कोटी महिलांना गॅस कनेक्शन दिले आहे. युवकांसाठी स्टार्ट अप योजने अंतर्गत ४३ हजार ८०० कोटीचे चे कर्ज आहे, यातून ९ लाख युवकांना रोजगार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील सैन्यदल सुविधांमध्ये परिपूर्ण झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. भारतीय सेना सशक्त झाली असून त्यांच्या आत्मविश्वास वाढला आहे. देशाच्या सिमावर्ती भागाचा विकास झालेला आहे. देशातील महिला, युवक, शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती या सर्व घटकांसाठी योजना दिल्या आहेत. या नऊ वर्षात सरकारमधील कोणत्याही व्यक्तीवर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नसल्याचे ते म्हणाले.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानंतर जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा झेंडा फडकवला जातो आहे ही मोदी सरकारची उपलब्धी आहे. आम्हाला देश जगातील सर्व शक्तिशाली देश म्हणून बनवायचा आहे. देशाला पुढे नेण्यासाठी आमच्या सरकारने खूप कामे केली आहेत. या सर्व कामांच्या आधारावर आम्ही २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे भाजपा राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय यांनी शेवटी सांगितले.