Blog

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव, प्रतिनिधी दिनाक-16-7-2026 :  – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसात टॅलेंट सर्च क्रिकेट क्लब आणि द्वारकाई ब्लास्टर्स स्पोर्ट्स क्लब यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविला.

दिवसातील पहिल्या सामन्यात टॅलेंट सर्च क्रिकेट क्लबने रंगरेज रॉयल्सचा ८६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत टॅलेंट सर्चने २० षटकांत ५ बाद १५६ धावा उभारल्या. पंकज महाजन यांनी नाबाद ७५ (६३ चेंडू), तर जय गायकवाड यांनी ३६ (२९ चेंडू) धावांची खेळी केली. रंगरेज रॉयल्सकडून मोईज कुक्षीवाला यांनी २, तर अमीन पिंजारी यांनी १ बळी घेतला.

१५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रंगरेज रॉयल्सचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत केवळ ७० धावांत गारद झाला. फराज शेख यांनी १७ धावा केल्या. टॅलेंट सर्चकडून समीर शाह आणि राज केसी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उत्कृष्ट फलंदाजीसाठी पंकज महाजन यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

दुसऱ्या सामन्यात द्वारकाई ब्लास्टर्स स्पोर्ट्स क्लबने पाचोरा स्पोर्ट्सवर १३ धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करत द्वारकाई ब्लास्टर्सने २० षटकांत ८ बाद १४० धावा केल्या. मनोज पाटील यांनी २८ (२४ चेंडू) आणि सोमलाल वारखेडे यांनी २२ (३१ चेंडू) धावांचे योगदान दिले. पाचोरा स्पोर्ट्सकडून लतिकेश पाटील यांनी ३, तर उन्नत राजपूत यांनी २ बळी घेतले.

प्रत्युत्तरात पाचोरा स्पोर्ट्सला २० षटकांत ८ बाद १२७ धावाच करता आल्या. उन्नत राजपूत यांनी नाबाद ३४, तौसिफ पठाण यांनी २९ आणि सुनी राठोड यांनी २९ धावा केल्या. द्वारकाई ब्लास्टर्स कडून मनोज पाटील यांनी ४, तर टिकू राठोड यांनी २ बळी घेतले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मनोज पाटील यांना सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला या सामन्यांसाठी संदीप झरे आणि प्रविण इंगोले यांनी पंच म्हणून, तर मोहम्मद फजल यांनी गुणलेखक म्हणून जबाबदारी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button