जळगाव

यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय  व नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार सोहळा

अतुल पेठे आणि दत्ता देसाई यांचा पुरस्काराने गौरव

जळगाव, दि12 (प्रतिनिधी) : येथील मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर आयोजित जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, जळगाव यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार’ आणि ‘नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्य पुरस्कार’ २०२६ प्रदान सोहळा गुरुवार, १२ मार्च रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाला. साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

प्रारंभी यशवंतराव चव्हाण आणि नटवर्य लोटू पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. प्रास्ताविकात डॉ. दादा गोरे यांनी पुरस्कार परंपरा आणि त्यामागील उद्देश याचा आढावा घेतला.

यावर्षीचा यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार पुणे येथील ज्येष्ठ लेखक दत्ता देसाई यांना “सनातन : राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद” या ग्रंथासाठी प्रदान करण्यात आला. तर नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्य पुरस्कार पुणे येथील नाटककार अतुल पेठे यांना नाट्यलेखन व मराठी रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व धनादेश देऊन पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे यांनी समितीचा अहवाल सादर करताना विजेत्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी डॉ. हंसराज जाधव व डॉ. गणेश शिंदे यांनी पुरस्कार विजेत्यांच्या साहित्य व नाट्य कार्याचा परिचय करून दिला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर दत्ता देसाई व अतुल पेठे यांनी मनोगत व्यक्त केले. ’व्यवहारवाद वाढला आहे त्या पलीकडे जाऊन त्याचे पुन्हा एकदा बघण्याची, संविधान बचाव करण्याची आज आवश्यकता असल्याचे’ देसाई म्हणाले. तर ’मराठी माणूस नाट्य शहाणा बनायला हवा. माझी या जातीचे भेटो कुणी…हे संत तुकाराम महाराजांचे वाक्य महत्वाचे आहे’ असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कोतिकराव ठाले पाटील होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून साहित्य व नाट्य क्षेत्रातील समृद्ध परंपरेचा गौरव केला.

नटवर्य लोटू पाटील यांचे नातू मंगेश काळे यांचा गौरव…
जिथे सोयगाव येथे नाटकाच्या तालमी व्हायच्या तिथे त्यांचे नातू मंगेश नारायणराव काळे यांनी नटवर्य लोटू पाटील कलादालन उभारले आहे. त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे. त्यांच्या या कार्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर तर्फे विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कोरडे यांनी तर डॉ. जयप्रकाश चांदखेडे यांनी आभार प्रदर्शन केले. साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button