
जळगाव, (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगाव शहरात प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रभाग क्रमांक १३ मध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. या भागात त्यांनी ‘होम टू होम’ भेटी दिल्या. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
प्रभाग १३ मधील गणपती नगर भागातील स्वाध्याय भवन आणि परिसरात गुलाबराव देवकर यांनी पायी फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांचा आढावा मांडला. महायुती सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय आणि भविष्यातील विकासाचा संकल्प मतदारांपर्यंत पोहोचवत, त्यांनी यावेळी महायुतीच्या उमेदवारांना भक्कम साथ देण्याचे आवाहन केले.
या जनसंपर्क मोहिमेदरम्यान देवकर यांच्यासोबत नितीन तायडे, नामदेव चौधरी, मधुकर पाटील, माजी नगरसेवक अनिल काळे, पिंटू जाधव, सीए अजय जैन, पुरुषोत्तम चौधरी, विशाल देवकर यांसह महायुतीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
घरोघरी सुरू असलेल्या या प्रचार मोहिमेला मतदारांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांशी संवाद साधताना देवकर यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. येणाऱ्या काळात जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे हात बळकट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.





