आयटीसी संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध
जळगाव, दि. 3 (प्रतिनिधी) – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले आहे. या दोन दिवसात अकादमीचे दोन स्कॉलर व दोन प्रतीथ यश कलावंतांचा सहभाग आहे.
आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त श्री दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंदनेने झाली. दीपप्रज्वलन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे सत्कार केले. या दोन दिवसीय महोत्सवाचे आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी केले.

आजचे प्रथम सत्र युवा आश्वासक नृत्यांगना नुपूर खटावकर व आर्या शेंदुर्णीकर या स्थानिक कलावंतांनी अप्रतिमरित्या सादर केलं. कथक नृत्य म्हटलं की ताल पक्ष हा आलाच त्याचे सौंदर्य नुपुरने आपल्यासमोर उलगडून दाखवले ते ताल तीनताल ने यात परंपरेप्रमाणे उठान, थाट, आमद, तसेच काही तुकडे, व तिहाई प्रस्तुत केले. त्यानंतर आर्याने एक अप्रतिम अशी कजरी सादर केली कजरी म्हणजे काळे ढग, पावसाचे वातावरण तयार होते तेव्हा काळे ढग जमतात, मग हलका हलका पाऊस पडायला लागतो, आणि मातीचा सुगंध दरवळतो पण हेच ढग माझे वैरी झाले आहेत कारण त्यांच्यामुळे मला माझ्या नायकाला भेटता येत नाहीये. पण तरीही त्याला भेटायला जाण्यासाठी ती खूप प्रयत्न करते कधी तिची ओढणी तर कधी सुप डोक्यावर घेऊन जाण्या चा प्रयत्न करते पण तरीही वाटेत येणारा अडथळा म्हणजे खड्डे, साप यावर मात करीत ती पूर्ण भिजते. पण तरीही तिला नायकाला भेटता येत नाही म्हणून ती तिच्या सखीला म्हणते “सखी बैरन भाई बरखा” ही डॉ. प्रभा अत्रे यांची देस रागातील बंदिश कजरीच्या माध्यमातून पेश करण्यात आली. त्यानंतर आर्या व लो पुरणे चतुरंग म्हणजे चार अंग अर्थात तरणा सरगम साहित्य आणि नृत्याचे बोल या चारही अंगांना एकमेकात सुंदर रित्या होऊन तयार होतो तो चतुरंग “उदानी दानी दिम” हे तराण्याचे बोल तर तर “श्याम बजाये ऐसी मुरलिया” हे साहित्याचे बोल यात त्यांनी दाखवले की कृष्णाच्या बासरी वादनामुळे मोर जागेवरच थांबतो. मासा पोहण्याचे थांबवतो. तर नदी पण उलट व्हायला लागते. कारण कृष्णाच्या बासरी वादनाने सगळेजण आपली शुद्ध हरतात. आजच्या या नृत्याची सांगता नुपूर व आर्या दोघांच्या चतुरंगने झाली आणि रसिकांनी त्यांना आनंदाने डोक्यावर घेतले.

आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सत्र स्कॉलर अनुभव खामरू याच्या शास्त्रीय गायनाने झाली. अभिनव ने राग चारुकेशी सादर केला यामध्ये बडाख्याल “आज आयो पाहूना” हा विलंबित एकताल व छोटा ख्याल द्रुत तिनतालात “रसना हरी गुण हमारी तुम्हारी राजन” सादर केला. त्याचप्रमाणे राग खमाज मधील एक ठुमरी सादर केली. बोल होते “पनिया भरण कैसे जाऊ” अनुभवला तबल्याची साथ युवा तबलावादक तेजोवृष जोशी यांनी तर संवादिनी साथ अनंत जोशी यांनी अत्यंत अप्रतिम रित्या केली.
तृतीय अर्थात समारोपाचे सत्र पं. रूपक कुलकर्णी यांच्या बासरी वादनाचे झाले. त्यांनी राग बागेश्री सादर केला. यामध्ये आलाप, जोड, झाला आणि त्यानंतर मध्यलय रूपक तालातील एक रचना सादर केली. त्यानंतर राग देस मधली एक बंदिश व द्रुत तीन तालातील एक बंदिश सादर करुन रूपक कुलकर्णी यांनी आपल्या सत्राचा समारोप माझे “माहेर पंढरी आहे भिमरेच्या तिरी” या भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या अभंगांनी केली. त्यांच्यासोबत त्यांचा शिष्य लितेश जेठवा याने त्यांना बासरी वादनात संगत केली. रूपकजीना तबल्याची तितकीच समर्थ साथ रवींद्र सिंह सोलंकी यांनी केली. आणि कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसविला. बासरी वादनाने आयटीसी संगीत संमेलनाचा समारोप झाला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट अनघा नाईक गोडबोले यांनी उत्तमरीत्या केले व कार्यक्रमाची रंगत वाढवली.





