अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
महाराष्ट्राचा यूएईवर १० गडी राखून दणदणीत विजय

जळगाव, दि. ७ (प्रतिनिधी): अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेला सोमवारी सुरुवात झाली होती. स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्राच्या संघाने गाजवला. पहिल्या दिवशी मिळालेल्या विजयाची मालिका महाराष्ट्राने दुसऱ्या दिवशीही कायम ठेवली. महाराष्ट्राने मंगळवारी झालेल्या सामन्यात यूएईच्या संघावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. यामुळे उपांत्यफेरीत पोहचण्याचा महाराष्ट्राचा दावा अधिक प्रबळ झालेला आहे.
सीआयएससी स्पर्धेतील दुसरा दिवस महाराष्ट्राने गाजवला. दुपारच्या सत्रात महाराष्ट्र आणि यूएई यांच्यात लढत होती. या लढतीची नाणेफेक सौ.ज्योती अशोक जैन यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे, प्रशिक्षक तन्वीर अहमद आणि क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी आंध्र प्रदेश आणि यूएई सामन्यात नाबाद ६३ धावांची खेळी करणाऱ्या शंतून याचा सौ.ज्योती जैन यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकत यूएईला प्रथम फलंदाजी दिली. महाराष्ट्राचा गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत यूएईचा फलंदाजांना जखडून ठेवले. यूएईचा संघ १५ षटकांत ८ गडी गमवात ७७ धावाच करु शकला. महाराष्ट्राकडून अनुग्रह डोंगरने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तनिष जैन याने एक आणि समकित मुथा याने दोन गडी बाद केले. ७८ धावांचे सोपे आव्हान घेऊन मैदानात उतरलेले महाराष्ट्राच्या दोन्ही सलामीवीरांनी जोरदार फटकेबाजी केली. शारव शहा याने २४ चेंडूत ३१ तर आदर्श गव्हाणे याने २४ चेंडूत ४१ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी ७.४ षटकांत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला.
मंगळवारी सकाळच्या सत्रात पहिला साखळी सामना बिहार- झारखंड विरुद्ध तामिळनाडू-पाँडेचरी यांच्यात झाला. त्यात बिहारच्या संघाने १३.५ षटकांत केवळ ६८ धावा केल्या. तामिळनाडू संघाने ६९ धावांचे आव्हान ९.४ षटकांत चार गडी गमावत पूर्ण केले. सहा गडीने तामिळनाडू संघाचा विजय झाला. उत्तराखंड विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यांत उत्तराखंडने १६ धावांनी विजय मिळवला. उत्तराखंडने १५ षटकांत ८ गडी गमावत ९३ धावा केल्या होत्या. परंतु आंध्र प्रदेशचा संपूर्ण संघ ७७ धावांवर १३.५ षटकांत गारद झाला. नार्थ वेस्ट आणि ओडिशा दरम्यान झालेला सामना चुरशीचा ठरला. नार्थ वेस्टने निर्धारित १५ षटकांत ११९ धावा काढल्या होत्या. उत्तरादाखल ओडिशाच्या संघाने १५ षटकांत ५ गडी गमावत ११० धावा केल्या. यामुळे नार्थ वेस्टचा संघ ९ धावांनी विजेता ठरला. नार्थ इंडिया आणि कर्नाटक-गोवा यांच्यातील लढत रोमहर्षक ठरली. या लढतीत नार्थ इंडियाच्या संघाने २ धावांनी विजय मिळवला. नार्थ इंडियाने प्रथम फलंदाजी करत ११४ धावा केल्या होत्या. कर्नाटक संघाने सहा गडी गमावत ११२ धावा केल्या. त्यामुळे नार्थ इंडियाचा दोन धावांनी निसटता विजय झाला. मध्य प्रदेश आणि तामिळनाडू यांच्यात झालेल्या लढतीत तामिळनाडूने एकतर्फी विजय मिळवला.
तामिळनाडूच्या भेदक गोलंदजांसमोर मध्य प्रदेशाचा संपूर्ण संघ केवळ २३ धावांवर बाद झाला. २४ धावांचे आव्हान तामिळनाडूने केवळ १.२ षटकांत पूर्ण केले. हा सामना एकतर्फीच ठरला. यूएई आणि आंध्र प्रदेश- तेलंगणा यांच्यातील सामन्यात आंध्र प्रदेशने आठ गडी राखत विजय मिळवला. यूएईने १०५ धावा केल्या होत्या. आंध्र प्रदेशने १० षटकांत १०६ धावांचे लक्ष्य पूर्ण करत विजयाची मोहर उमटवली.
पश्चिम बंगाल आणि नार्थ वेस्ट यांच्यातील सामन्यात पश्चिम बंगालने ३३ धावांनी विजय मिळवला. पश्चिम बंगालने दिलेले १३४ धावांचे आव्हान नार्थ वेस्ट पेलू शकला नाही. त्यांचा संघ निर्धारित १५ षटकांत केवळ ८७ धावाच करु शकला. बिहार आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामना मध्य प्रदेशने चार गडीने जिंकला. बिहारने १४ षटकांत १० गडी गमावत १०४ धावा केल्या होत्या. मध्य प्रदेशने १४.२ षटकांत सहा गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केले. नार्थ इंडिया आणि केरळ यांच्यातील लढतीत केरळचा विजय झाला. नार्थ इंडियाने निर्धारित १५ षटकांत १०२ धावा केल्या होत्या. केरळच्या संघाने १४.२ षटकांत हे आव्हान पूर्ण केले.
बुधवारी उपांत्यफेरीच्या लढती
सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत उपांत्यफेरीच्या लढती बुधवारी होणार आहे. अ गटातील सर्वाधिक गुण मिळवणार संघ ड गटातील प्रथम स्थानी असणाऱ्या संघासोबत खेळणार आहे. तसेच ब आणि क गटातून प्रथम स्थानावर असलेल्या संघात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. त्यानंतर गुरुवारी निर्णायक सामना खेळला जाईल.