जळगाव

गोसेवेचा घराघरात रुजावा संस्कार! – प्रदीप शर्मा यांचे आवाहन

धुळे येथे जमनाबेन लोकसेवक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

धुळे दि.१० (प्रतिनिधी – ‘मानवासाठी गायीचे दूध, शेण अत्यंत उपयुक्त ठरले आहे. गोसेवेचा घराघरात संस्कार रुजणे ही काळाची गरज आहे.

‘घरटी एक गाय!’ हेच तत्त्व अंगीकारलं पाहिजे. गोपालन हा संस्कार आहेच शिवाय सर्व बाजूंनी विचार केल्यास आर्थिक, सामाजिकदृष्ट्याही हिताचे आहे. गौठान योजनेच्या माध्यमातून छत्तीसगड मध्ये लाखो शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडून आलेला आहे.’ असे प्रतिपादन छत्तीसगड येथील प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गो विज्ञान समिती मालेगाव, धुळे आणि गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदीप शर्मा यांना ‘जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात ते

त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. व्यासपीठावर नरेश यादव (भूतपूर्व खासदार व लोकसेवक) आणि सेवाग्राम आश्रमाचे मंत्री विजय तांबे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, ज्येष्ठ सर्वोदयी डॉ. सुगन बरंठ, ‘साम्ययोग साधना’ पाक्षिकाचे संपादक रमेश दाणे उपस्थित होते.

महाराष्ट्र गोविज्ञान समिती मालेगाव व धुळे आयोजित तसेच भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने गोसेविका जमनाबेन कुटमुटिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार सोहळा ९ मार्च रोजी, धुळ्यात बर्वे कन्या छात्रालय येथे संपन्न झाला. कुटमुटिया दाम्पत्यांनी आपल्या जीवनातील २० वर्षांहून अधिक काळ धुळे शहरातील वास्तव्यात व्यतित केला. या शहरातच त्यांनी बहुतांश काळ गोसेवेसाठी दिला होता. बाईं सोबत गो सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विस्तारित परिवार धुळ्यात असल्यामुळे प्रस्तुत पुरस्कार धुळ्यात देण्यात आला.

१९९९ पासून २०१९ पर्यंत २५ वर्षे मालेगाव येथे पुरस्कार दिले गेले. यावर्षी प्रस्तुत पुरस्कार छत्तीसगड राज्याचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कुमार शर्मा यांना प्रदान करण्यात आला.पुढील काळात धुळे येथेच या पुरस्काराचे वितरण होणार असून त्यासाठीची समिती तयार करण्यात आलेली आहे.

सत्काराला उत्तर देताना प्रदीप शर्मा पुढे म्हणाले की, आम्ही लहान होतो त्यावेळी प्रत्येकाच्या घरात गायी होत्या. गाय असल्याने शेतात प्रोटीन कडधान्य पेरले जात असे. आजच्या काळात महिला आणि बालकांमध्ये प्रोटीनची कमतरता दिसते आहे. गायींबद्दल सांगायचे तर आमच्याकडे १ कोटी ३० लाख गोवंश आहे, त्यापैकी ६५ लाख गायी आहेत. त्यात अडीच लाख महिला गायीच्या शेणापासून खत तयार करतात त्यातून ५२ करोड रुपयांचे उत्पन्न महिलांना मिळाले होते. गौठानचे कामासंदर्भातही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

उजडता गाव, दम घुटता शहर – माजी खासदार नरेश यादव

मी स्वतः गो पालक आहे, माझे गायीवर प्रेम आहे परंतु शेतीत आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपयोगात आणल्यामुळे बैल, गाय शेतीतून हद्दपार होतात की काय याची भीती वाटते आहे. जैन इरिगेशनच्या जैन हिल्सवरील आधुनिक शेतीचे प्रयोग, उपयोग केलेल्या उच्च कृषी तंत्रज्ञानाची ओळख काल मी करून घेतली. जैन इरिगेशनने भूमिपुत्रांसाठी केलेल्या कामांमुळे कृषीक्रांती घडली आहे. आमच्याकडील मखाना उत्पादकांना जैन इरिगेशनने मार्गदर्शन करावे असे आवाहन करीत जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी जैन हिल्स येथील गांधी, गाय यांच्यासाठी केलेले सेवाभावी काम स्पृहणीय असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. प्रस्तुत पुरस्कार देऊन गोसेवेस प्रोत्साहन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘उजडता गांव, दम घुटता शहर’ ही परिस्थिती बदलवायची असेल तर प्रत्येकाने गोसेवा करायलाच हवी अशी आंतरिक साद त्यांनी घातली.

गाय आणि महिला सक्षमीकरण होणे गरजेचे – विजय तांबे

आम्ही मुंबईत राहिलेलो आहोत त्यामुळे गायीविषयी बोलू शकलो नसतो परंतु सेवाग्रामला काम करू लागलो त्यावेळी गाय, आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर अभ्यास करण्यासाठी मिळाला. गाय आणि गावातले प्रश्न समजावून घेतले. हा अभ्यास करताना एकच निष्कर्ष काढला की गाय आणि महिला यांच्या सक्षमीकरणाशिवाय परिस्थितीत सुधारणा होऊ शकत नाही. गायीच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्माण झाला तर गाय वाचेल हे खूप महत्त्वाचे आहे!

प्रदीप शर्मा यांनी गाय आणि गाव या संदर्भातील समस्यांचा उहापोह केला आणि लोकांशी संबंधित जबाबदा-याबाबत मार्गदर्शन केले. प्रदीप शर्मा यांनी गौठाणच्या रुपाने खूप मोठे योगदान दिल्याबद्दल आदर भावना व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.

पुढील पिढीसाठी गांधी साहित्य – उदय महाजन

गांधीतीर्थमध्ये पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवकांसाठी महात्मा गांधीजींचे साहित्य संग्रहीत करण्यात आलेले आहे. २०१२ मध्ये गांधी रिसर्च फाउंडेशनची सुरुवात झाली. साडेपाच लाख पानांचे साहित्य गोळा केले, साडे चौदाहजार दुर्मीळ पुस्तके येथे उपलब्ध आहेत. धुळे येथे निर्माण झालेल्या ‘गीताई’ची मूळ प्रत गांधी रिसर्च फाउंडेशनमध्ये सुरक्षित संग्रहित केली आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनमूल्यांचा शोध आणि वेध घेणारे जगातील पहिले ऑडिओ गाईडेड म्युझिअम आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारा संपन्न होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती महाजन यांनी दिली आणि म्युझिअमला भेट देण्याचे आवाहनही केले.

नरेश यादव आणि वर्धा येथील आश्रमाचे मंत्री विजय तांबे यांच्या हस्ते प्रदीप शर्मा यांना रुपये ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. पुरस्काराची रक्कम त्यांनी हरिजन सेवक संघाच्या बर्वे छात्रालयातील मुलामुलींकरिता भेट दिली.

सन्मानपत्राचे वाचन वाचन वैभव जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अपश्चिम बरंठ यांनी तर आभार प्रदर्शन विजय कळमकर यांनी केले. पुरस्कारार्थी प्रदीप शर्मांच्या कामासंदर्भातील डॉक्युमेंटरीचा व्हिडिओ उपस्थितांना दाखविण्यात आला. कार्यक्रमास कुटमुटिया परिवाराचे सदस्य चेतन कुटमुटिया आणि सौ. नीकिता कुटमुटिया उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धुळे येथील मधुकर शिरसाठ, कृष्णा शिरसाठ, अनिता रामराजे, वैशाली पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्रा.विलास चव्हाण,

जगदीश देवपूरकर, प्रवीण जोशी, नरेंद्र वडगावकर, डॉ.मृदुला वर्मा, नाजनीन शेख, अनिल जोशी, अनिल देवपूरकर, रमेश पवार, रमेश पाकड, विजय महाले, सुमन महाले, किशोर कुळकर्णी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button