जळगाव

तिसरी स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

जळगाव दि 3 प्रतिनिधी – तिसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे २५ फेब्रुवारी २०२५ ते २ मार्च २०२५ दरम्यान
आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यामार्फत केले होते.
या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा पोलीस कवायत मैदान व अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर घेण्यात आली.

या स्पर्धेचा अंतिम सामना झैन क्रिकेट क्लब विरुद्ध जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या ब्ल्यू संघादरम्यान खेळण्यात आला. अंतिम सामन्याची नाणेफेक जळगाव जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष युसूफ मकरा यांच्या हस्ते झाले. झैन क्रिकेट क्लब ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु कर्णधाराच्या या निर्णयाला त्यांच्या संघातील फलंदाजांनी आवश्यक तेवढा प्रतिसाद दिला नाही. त्यांचा संपूर्ण संघ १९ व्या षटकात केवळ ९७ धावात गारद झाला. जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे शतायु कुलकर्णी या डावखुरा फिरकीपटूने चार षटकात केवळ १७ धावा देत तीन महत्त्वपूर्ण बळी मिळविले. त्याला दुसरा डावखुरा गोलंदाज नीरज जोशी उबेद खाटीक यांनी प्रत्येकी दोन बळी मिळत चांगली साथ दिली. तर कर्णधार राहुल निंभोरे यांनी आपल्या लेग स्पिन गोलंदाजीवर सुद्धा दोन बळी मिळविले तर झैन क्रिकेट क्लब तर्फे रोहित वंजारी याने थोडाफार प्रतिकार करत 24 चेंडूत 32 धावा केल्या. मासूम खाटीक याने 19, शाहरुख शेख याने 13 तर अली हुझेफा याने 10 धावा काढून आपल्या संघाला 90 पार नेले.

98 धावांचे माफक लक्ष घेऊन उतरलेल्या जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत हा सामना केवळ आठ षटकात 98 धावांचे लक्ष्य एका बळीच्या मोबदल्यात पूर्ण करून विजयी चषकावर आपले नाव कोरले. नीरज जोशी हा २९ धावा काढून बाद झाला. सिद्धेश देशमुख याने नाबाद ६१ धावांचे (१० चौकार व ३ षटकार) योगदान देऊन आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिली.
अंतिम सामना संपल्या बरोबर या संपूर्ण स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर टी. धारबडे तसेच पोलीस मुख्यालयाचे समाधान गायकवाड यांची उपस्थिती होती तर स्वर्गीय किरण दहाड परिवारातील अशोक दहाड, संजय दहाड व चंद्र दहाड हे उपस्थित होते. त्याचबरोबर जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष एस टी खैरनार, सहसचिव अविनाश लाठी व सचिव अरविंद देशपांडे तसेच झैन क्रिकेट क्लबचे संचालक सरोज शेख यांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते खालील प्रमाणे पारितोषिके वितरित करण्यात आली
१. अंतिम सामन्याचा सामनावीर जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा नीरज जोशी (१५ चेंडू २९ धावा व ११धावत २ बळी)
२. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा उबेद खाटीक (४ सामन्यात सर्वाधिक ९ बळी)
३. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा सिद्धेश देशमुख (२ सामन्यात सर्वाधिक १३१धावा)
४. स्पर्धेचा मालिकावीर हे बक्षीस सुद्धा जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा कर्णधार राहुल निंभोरे यांनी पटकावले (४ सामन्यात ८ बळी घेतले तर स्पर्धेत ३५ धावा पण केल्या होत्या
४. स्पर्धेचा उपविजय संघ हा झैन क्रिकेट क्लब हा ठरला असून त्यास ₹ १५००० रुपये रोख व चषक देण्यात आला.
५. या तिसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम विजय संघ हा जैन स्पोर्ट्स अकॅडमी ठरला असून त्यांना ₹ २५००० रोख व चषक देऊन गौरवण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस मुख्यालयाचे श्री समाधान गायकवाड साहेब यांनी बहुमोल सहकार्य केले तर जय स्पोर्ट्स अकॅडमी व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या खेळाडू तसेच स्वयंसेवकांनी सर्व बाबतीत सहकार्य करून ही स्पर्धा यशस्वी केली
सर्व सहभागी संघ खेळाडू तसेच वैयक्तिक बक्षीस प्राप्त खेळाडू व उपविजय व विजय संघांना जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button