सहा दशकानंतर जळगाव शहरातून करणार महिला उमेदवारी
जळगाव (प्रतिनिधी): आताचा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ आणि पूर्वीचा जळगाव विधानसभा मतदारसंघाचा इतिहास तपासला असता १६६२च्या विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरातून काँग्रेस पक्षाने प्रतिभाताई पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्या निवडून आल्या होत्या. पुढे त्या देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या.
सन १९६२ नंतर एखाद्या प्रमुख पक्षाने जळगावातून एका महिलेला उमेदवारी देण्यासाठी २०२४ हे वर्ष उजाडले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीअंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने माजी महापौर जयश्री सुनिल महाजन यांना उमेदवारी दिली आहे.
मध्यंतरीच्या काळात अनेक स्थित्यंतरे झालीत. शरद पवार मुख्यमंत्री असतांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी ३३% जागा राखीव केल्या गेल्या नंतर विलासराव देशमुखांच्या काळात हेच आरक्षण ५० टक्क्यांवर गेले. मात्र विधीमंडळ व संसदीय पटलावर अजूनही महिला वर्ग तसा उपेक्षीतच राहीला आहे. नाही म्हणायला गेल्या केंद्रसरकारच्या काळात महिला आरक्षण विधेयक पारीत करण्यात आले, परंतू आरक्षण कधीपासून अस्तित्वात येईल? याची निश्चिती नाही.
सहा दशकांनंतर एखाद्या प्रमुख पक्षाने जळगावातून एका महिलेला उमेदवारी दिली आहे. मिळालेल्या या संधीचे स्वागत शहरातील महिला वर्ग कशा पद्धतीने करतो? याची राजकीय जाणकारांना उत्सुकता आहे.