नवी दिल्ली वृत्तसंस्था– केरळ मधील एका न्यायालयाने आपल्या मुलीवर चार वर्षे वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एका ६६ वर्षीय व्यक्तीला दोषी ठरवत ७२ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. विशेष सरकारी वकील शिजोमोन जोसेफ यांनी सांगितले की, इडुक्की फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश लैजुमोल शेरिफ यांनी आरोपीला पोक्सो कायदा आणि आयपीसी अंतर्गत एकूण ७२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
मात्र, दोषीला २० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. सर्व शिक्षा एकाच वेळी दिल्या जातील. २० वर्षांची शिक्षा ही न्यायाधीशांनी सुनावलेली सर्वोच्च तुरुंगवासाची शिक्षा होती. न्यायालयाने दोषीला १.८ लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून ही रक्कम पीडितेला दिली जाईल,असे सांगितले.
सुट्टीच्या काळात शाळेच्या वसतिगृहातून वागमोन गावातील आपल्या घरी येणारी पीडित मुलगी १० ते १४ वर्षे वयोगटातील असताना तिच्यावर बलात्काराची घटना घडली. २०१२ ते २०१६ या कालावधीत हा गुन्हा घडला. मात्र, २०२० मध्ये तिने तक्रार केली होती.
वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची माहिती कोणाला सांगितल्यास आरोपी तिला ठार मारेल, अशी भीती असल्याने मुलीने आपल्यावरील अत्याचाराची माहिती कोणाला सांगितली नाही, असे सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले. तिचे वडील खुनाच्या गुन्ह्यात आधीच तुरुंगात होते.
पीडितेला अभ्यासात मदत करणाऱ्या तिच्या वडिलांच्या मित्राला हा प्रकार समजल्यानंतर त्याने तिला धीर दिला. त्याच्या मदतीने मुलीने पोलिसांसमोर येऊन वडिलांविरोधात तक्रार दाखल केली.
एसपीपीने असेही सांगितले की, मुलीला वडिलांकडून आलेले वाईट अनुभव कागदाच्या तुकड्यांवर लिहून बेडखाली ठेवण्याची सवय होती. गुन्ह्याच्या ठिकाणी पोलिसांना या चिठ्ठ्या सापडल्या आणि सरकारी पक्षाला मदत झाली.