आवाज मराठी जळगाव – पावसाच्या कविता व गाण्यांनी संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तनच्यावतीने “आषाढस्य प्रथम दिवसे” हा दिवस साजरा करण्यात आला. याच दिवशी कवी कालिदासाने मेघदूत हे अजरामर काव्य लिहिले. कालिदासाच्या काव्याने जगाला मोहिनी घातली असून आषाढ महिन्यातला पहिला दिवस महाकवी कालिदास दिन साजरा होत असतो. परिवर्तनच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून या दिवशी कवितेचा कार्यक्रम होत असतो. यंदा “पावसाच्या कविता व गाण्यांचा कार्यक्रम” घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात तुकोबांच्या ‘भेटी लागी जिवा’ या अभंगांने करण्यात आली. मेघदूतातील काही ओळी वरुण नेवे यांनी सादर केल्या. बहिणाबाई, ना.धों. महानोर, बालकवी, ग्रेस, सौमित्र, श्रीकांत देशमुख, अशोक कोतवाल, जितेंद्र कुवर या कवींच्या कविता सादर करण्यात आल्या. हिंदी व मराठी सिनेमातील पावसाची गाजलेली निवडक गाणी रजनी पवार, वरुण नेवे यांनी आपल्या अप्रतिम सुरात मैफिलीत रंग भरले. विकास वाघ यांनी ‘पड रे पाण्या पड, कालचा पाऊस आमच्या गावी आलाच नाही…’ सादर केले. पंकज पाटील, साक्षी माळी, हर्षदा पाटील यांनी प्रभावीपणे कवितांचे सादरीकण करत दाद मिळवली. निवेदन हर्षल पाटील यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना मोना निंबाळकर यांची तर दिग्दर्शन मंगेश कुलकर्णी, निर्मिती प्रमुख डॉ किशोर पवार व प्रा. मनोज पाटील हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नंदू अडवाणी, अनिश शहा, डॉ रेखा महाजन, सुनील पाटील , अमर कुकरेजा यांच्या हस्ते कलावंतांचा सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी केले. कार्यक्रमासाठी रोटरी क्लब गणपती नगर यांचे सहकार्य लाभले होते.