अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
दोन ट्रॅक्टरवर कारवाई, तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
टीम आवाज मराठी, जळगाव। २४ जून २०२३ । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन्ही ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या पिंप्राळा परिसरातून शुक्रवार २३ जून रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांना आढळले. दोघेही ट्रॅक्टर चालकांकडे वाळू वाहतुकीचा कोणत्याही प्रकारचा परवाना आढळून आला नाही. त्यामुळे तालुका पोलिसांनी वाळूने भरलेले दोघे ट्रॅक्टर पोलिस स्टेशनला जमा केले. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही ट्रॅक्टरचे अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस स्टेशनला २३ जून रोजी रात्री १२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील कार्यवाही पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड करीत आहे. दिवसेंदिवस वाळू तस्करीचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी देखील कारवाई करण्यासाठी वाळू वाहतुकीवर लक्ष ठेवल्याचे चित्र पहायला मिळत आहे.