टीम आवाज मराठी मुंबई प्रतिनिधि | २४ ऑगस्ट २०२३ | मुंबई येथील काही तासांपूर्वी मंत्रालयाजवळील आजूबाजूच्या परिसरात ब्लास्ट होऊन मंत्रालयाच्या इमारतीत व तेथील लावण्यात आलेल्या पार्किंग मधील खाजगी वाहनांची कांचे सुद्धा फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच मोठी खळबळ उडाली होती. अशातच आता ही घटना ताजी असतानाच मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे…
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव बाळकृष्ण ढाकणे असे असल्याचे सांगितले जात असून तो अहमदनगरचा असल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन देण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच बोलणं करुन दिले नाही तर मंत्रालयात ठेवलेल्या बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्यात येईल अशी धमकी त्याने निनावी फोन करून दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंत्रालय परिसरात श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथक तैनात करून तपासणी केली. पण, बॉम्ब कुठेच नसल्याची पोलिसांनी खात्री केली आहे. तसेच मंत्रालयात येणाऱ्या वाहनांची सखोल तपासणी केली जात असून या निनावी फोननंतर मंत्रालयाच्या बाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तर गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्या बाबतचा धमकीचा फोन आला आहे.
हाती मिळालेल्या वृत्तानुसार, मंत्रालयाच्या बाहेर मेट्रोचे काम सुरु आहे. या मेट्रोच्या कामासाठी ब्लास्टचे काम सूरू होते. त्यावेळी ब्लास्ट करतेवेळी अनेक दगड मंत्रालयाच्या दिशेने आले. त्यावेळी मंत्रालयाच्या इमारतीत व तेथील लावण्यात आलेल्या पार्किंग मधील खाजगी वाहनांची काचा फुटल्या. तसेच मंत्रालयाच्या खिडक्याच्या काचा देखील फुटल्या आहेत. दरम्यान, या घटनेमध्ये सुदैवाने आतापर्यंत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली असून वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मंत्रालयासारख्या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील परिसरात अशी घटना घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.