टीम आवाज मराठी टीम | १९ जुलै २०२३ | येथील जामनेर तालुक्यातील लहासर परिसरातील जंगलात पोत्यामध्ये कोंबून ठेवलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कुजलेल्या अवस्थे मध्ये मृतदेह असून सदर व्यक्तीची हत्या करुन तिचा मृतदेह पोत्यात कोंबून जंगलात फेकून दिल्याचं चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, मयत महिला की पुरूष हे समोर आलेले नसून मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी पोलिसांनीच स्वत: फिर्यादी होवून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
जामनेर बोदवड रोडवरील लहासर जंगलात सोमवारी दुपारी पोत्यात बांधलेल्या प्रौढाचा मृतदेह आढळल्याने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. लहासर शिवारातील जंगलात दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास गुराखी गुरे चारत होता. त्याठिकाणी तेथे त्याला दुर्गंधी आली. त्याने आजूबाजूच्या ठिकाणी पाहिले असता एका पोत्या मधून दुर्गंधी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने सदर माहिती गावातील ग्रामस्थांना सांगितली. आणि त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला संपर्क साधला. जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळी पोहचले.सदर बांधलेले पोते उघडून बघितले असता त्यात मृतदेह आढळून आला. मयत प्रौढाचे हात-पाय बांधून पोत्यामध्ये भरून ठेवल्याचे तपासणीत निष्पन्न झाले जवळपास एक महिन्यापूर्वी खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारेकऱ्यांनी खून करुन मृतदेह पोत्यात भरुन त्याला जंगलात फेकून त्याची विल्हेवाट लावली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी निलेश वासुदेव घुगे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलिसांनी सुमारे जवळपास पाच किलोमीटरचा भाग पिंजून काढला. मात्र, मयत व्यक्ती संदर्भात कोणतीही माहिती पोलिसांना प्राप्त झाली नाही. पोत्यामध्ये आढळून आलेला मृतदेह हा पुरूषाचा की स्त्रीचा आहे याबाबत वैद्यकीय तज्ञ सुध्दा कुठलाही निष्कर्ष काढू शकत नसल्यामुळे पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान आहे. मयताचे अंदाजे वय हे ४० ते ४५ असून मयताचे दात पूर्णपणे साबूत आहे. त्याच्या अंतर्वस्त्रावरुन ओळख पटू शकते, असं पोलिसांनी सांगितले आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीसाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात बेपत्ता असलेल्या व्यक्तींची पडताळणी केली जात आहे.