टीम आवाज मराठी, पुणे । १५ जुलै २०२३ । तळेगाव दाभाडे येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक्सरबीया सोसायटी, आंबी येथे मराठी सिने अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी (वय ७७ वर्षे) हे बंद फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आले आहेत. ते गेले ७-८ महिन्यापासून एक्सरबीया सोसायटी,मध्ये ठिकाणी एकटेच राहण्यास होते. त्यांचा मृत्यू २-३ दिवसांपूर्वी झालेला असावा. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा गश्मिर यांना कळविण्यात आली असून,ते आताच तळेगाव दाभाडे, रुग्णालयात पोहोचले असून त्यांच्या वडिलांच्या
मृतदेहाचे पोस्ट मोर्टेम करण्यात येत आहे. मराठी चित्रपटसुष्टीतील एव्हरग्रीन हीरो म्हणून परिचित असणारे महाजनी यांनी अनेक मराठी चित्रपट गाजवले. ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे अनेक यशस्वी चित्रपट महाजनी यांनी केले.
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासंदर्भातील ट्वीट मुख्यमंत्र्यांच्या CMO Maharashtra या ट्वीटर हँडलवरून करण्यात आलं आहे. रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून महाजनी यांनी चित्रपटात केलेली आपली कारकीर्द मराठी रसिकांच्या निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्या निधनाने एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला असे सांगून ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी दुःख व्यक्त करून आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झालेली आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या @PawarSpeaks ट्विटर वरून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.