
जळगाव – जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावे, असे स्पष्ट आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी केले आहे.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जात असून उमेदवारी अर्ज माघार प्रक्रियेनंतर महायुतीचे सर्व अधिकृत उमेदवार जाहीर झाले आहेत. कमळ, धनुष्यबाण व घड्याळ या चिन्हांवरील उमेदवार हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग क्र. १३ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून १३-अ गटातून सपके नितीन प्रभाकर, १३-ब गटातून तायडे सुरेखा नितीन हे उमेदवार असून १३-क गटातून वैशाली पाटील अमित यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १३-ड गटातून देवकर प्रफुल्ल गुलाबराव हे अधिकृत उमेदवार आहेत.
दरम्यान, पक्षाने सूचना देऊनही काही इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असून, जणूकाही ते भाजपाचेच उमेदवार आहेत अशा पद्धतीने प्रचार करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, अशा बंडखोर उमेदवारांनी येत्या दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट न केल्यास त्यांच्यावर पक्षातर्फे योग्य ती कारवाई करण्यात येईल.
या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून प्रभाग क्र. १३ मधील सर्व मतदार बंधू-भगिनींना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच भरघोस मतांनी विजयी करावे.



